Saturday, November 22, 2025

मेहरनगड : सांस्कृतिक इतिहासाची ओळख

मेहरनगड :  सांस्कृतिक इतिहासाची ओळख

विशेष : सीमा पवार

संपूर्ण राजस्थानमधील सर्वात प्रभावी आणि मोठ्या किल्ल्यांपैकी एक मेहरनगड आहे. किल्ल्याच्या आत अनेक राजवाडे आणि संग्रहालय आहेत. जे भूतकाळातील काही भव्य-दिव्य गोष्टींची आठवण करून देते. मेहरनगड किल्ला हे राजस्थानच्या कलात्मक आणि सांस्कृतिक इतिहासाची ओळख असल्याचे मेहरनगडाच्या पहिल्या महिला गाईड हेमकुंवर शेखावत यांनी माहिती दिली.

हा किल्ला राजपूत शासक राव जोधा यांनी बांधला होता. हा किल्ला आजही मजबूत भिंतींनी वेढलेला आहे. भिंतींवर त्याने केलेल्या लढायांच्या आणि टिकून राहिलेल्या तोफांच्या खुणा इथे दिसतात. किल्ल्याच्या विविध ठिकाणांवरून निळ्या शहराचे जोधपूरचे एक सुंदर आणि आकर्षक दृष्य पाहता येते. मेहरनगड किल्ला जो आजूबाजूच्या जुन्या शहरांपासून सुमारे ४०० फूट उंचीवर आहे. शहरातून एक वळणदार रस्ता किल्ल्याकडे जातो, जो १२० फूट उंच भिंतींनी बांधलेला आहे. या भिंती राजस्थानातील काही सर्वात सुंदर राजवाडे आणि सांस्कृतिक वास्तूंचे जतन करतात. मेहरनगड किल्ल्यात त्या काळी राजे महाराजे, महाराणी यांना सफर करण्यासाठी वापरत असलेल्या पालख्या आहेत. या पालख्या विविध धातूंपासून तयार केल्या आहे. हस्तिदंत, सोने, दगडांनी सजवलेल्या आहेत. त्यांना आकर्षक आवरणांनी झाकलेले होते. या पालख्या उत्कृष्ट कलाकृतीचे प्रतीक आहेत. किल्ल्यात दौलत खाना गॅलरी आहे. गॅलरीमध्ये मुघल आणि राजपूत काळातील ललित कलांचा संग्रह आहे. हा संग्रह कापड, सजावटीच्या कला आणि चित्रांचा एक उत्तम संगम आहे. त्यात शस्त्रांचे प्रदर्शन, शिरस्त्राण आणि हस्तलिखिते देखील आहे. त्यात मुघल सम्राट अकबराची तलवार आहे. या प्रत्येक गॅलरीमध्ये प्रत्येक शासकाने सोडलेले लष्करी पुरावे आहेत. त्यात शिरस्त्राण, चिलखत, तलवारी आहेत. या शस्त्रागारात केवळ धातूच्या वस्तूच नाहीत, तर कुशलतेने बनवलेल्या आणि सजवलेल्या चामड्याच्या वस्तू आहेत. पेंटिंग गॅलरीमध्ये मारवाड शाळेतील लघुचित्रांचे प्रदर्शन आहे. त्यात राजेशाही जीवनशैली जिवंत करणारी चित्रे आहेत. किल्याच्या प्रत्येक भागात लोककला सादर करणारे पारंपरिक पोशाखातील जोधपूरकर येणाऱ्या पर्यटकांना आपल्या आवाजात येथील लोकसंगीताचा आनंद देतात. जोधपूरमधील मेहरनगड किल्ल्यावर कठपुतळी कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात.

किल्ल्यामध्ये विजयाचे स्मरण करण्यासाठी सात दरवाजे आहेत. जय पोल आणि फतेह पोल हे सर्वात उल्लेखनीय दरवाजे आहेत. तोफगोळ्याच्या प्रहारांच्या खुणा, सती झालेल्या महिलांच्या प्रतीकात्मक हाताचे ठसे असलेले लोहा पोल आहे. गोपाळ पोल, अमृती पोल आणि सूरज पोल हे मेहरनगड किल्ल्याचे इतर तीन दरवाजे आहेत. मेहरनगड किल्ल्यावरून सूर्यास्त होणे ही एक खास गोष्ट आहे. कारण रात्रीच्या अंधारात सूर्य मावळताना शहराचे विहंगम दृश्य दिसते.

‘सम वाळवंट’ जैसलमेरच्या वाळवंटातील मुकुटमणी

जैसलमेरच्या सॅम वाळवंटाचे भूदृश्य सोनेरी रंगाने रंगले आहे. जे सूर्यास्तानंतर पिवळ्या धातूसारखे चमकते. हे अनेक वर्षांपासून एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटक इथे सायंकाळच्या वाळवंटातील थंड वाळूत गारव्याचा आनंद घेतात. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात इथे पर्यटक येतात. थार वाळवंटाच्या मध्यभागी असलेले, जैसलमेरपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेले सॅम वाळवंट हे सर्वात वेगाने वाढणारे पर्यटन स्थळ आहे.

मुंबईत समुद्रकिनारी फेरफटका मारणारा इथल्या वाळवंटात रमतो. या वाळूचा स्पर्श पायाला एक सुखद अनुभव देतो. काही क्षण एका नव्या जगात आल्याचं भासतं. मुंबईच्या धकाधकीतू्न काही क्षण का होईना ही अनुभूती स्वर्गसुखाहून कमी नाही. राजस्थानमध्ये जागोजागी प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकगीतांना महत्त्व दिले गेले आहे. राजस्थानच्या पोषाखात आजही इथला स्थानिक मिरवतो. महिलांचा पोषाख आजही घागरा चोळी आणि दुपट्टा असाच आहे. “गेल्या ५ वर्षांपासून येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटकांना वाळूच्या समुद्रात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाणारे, तसेच वाळवंटाची जीप सफारी करणारे वाहक आहेत. जे उंटावर बसलेल्या आणि जीप सफारी करणारे प्रत्येकाची तितकीच काळजी घेतात. या सॅम डेझर्टच वेगळेपण म्हणजे इथे रात्रीच्या जेवणासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पारंपरिक लोकसंगीतासह लोकनृत्याचेही आयोजन केलेले असते. आजही इथे स्थानिक लोकांचा हा रोजगार मानला जातो. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून मिळालेले बक्षीस हे यांचं मानधन असतं.

Comments
Add Comment