Saturday, November 22, 2025

अमेरिकेच्या आडकाठीनंतरही जी-२० घोषणापत्र मंजूर

अमेरिकेच्या आडकाठीनंतरही जी-२० घोषणापत्र मंजूर

शिखर परिषदेने परंपरा मोडली

जोहान्सबर्ग : अमेरिकेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकूनही जागतिक नेत्यांनी संयुक्त घोषणापत्राला मंजुरी दिल्याचे जाहीर करत, दक्षिण आफ्रिकेने शनिवारी आपल्या जी-२० शिखर परिषदेच्या योजना पुढे नेल्या. अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला व सांगितले की, महिन्यांच्या वाटाघाटीनंतर अंतिम दस्तऐवज तयार झाला असून तो पुन्हा चर्चेसाठी खुला केला जाणार नाही. त्यावर पुन्हा वाटाघाटी होऊ शकत नाहीत. हे घोषणापत्र स्वीकारण्यासाठी आम्ही वर्षभर प्रयत्न केले व गेल्या आठवड्यात तर खूपच वेगाने काम झाले, असे प्रवक्त्याने सांगितले.

अमेरिकेने जोहान्सबर्ग परिषदेत सहभागी होण्यास आधीच नकार दिला होता. अमेरिकेचा हा बहिष्कार, दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय बहुसंख्य सरकार श्वेत नागरिकांसोबत भेदभाव करत असल्याच्या दाव्यांवर आधारित होता. हे आरोप दक्षिण आफ्रिकेने फेटाळले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते नाकारण्यात आले आहेत. या बहिष्कारामुळे आफ्रिकन भूमीवर प्रथमच आयोजित झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या सुरुवातीवर सावट पसरले होते.

सामान्यतः जी-२० चे घोषणापत्र बैठकीच्या शेवटी पारित केले जाते. या वेळी परंपरा मोडत शिखर परिषद सुरू होताच घोषणापत्र एकमताने स्वीकारण्यात आले. यजमान देशाचा विकसनशील राष्ट्रांना हवामान संबंधित आपत्तींशी जुळवून घेण्यास मदत करणे, स्वच्छ ऊर्जेचा विस्तार करणे आणि कर्जाचा खर्च कमी करणे यावरचा भर ट्रम्प यांनी नाकारला होता.

अनेक जागतिक नेत्यांशी सुसंवाद दक्षिण आफ्रिकेतील जी-२० शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी संभाषणादरम्यान मनमोकळेपणाने हसताना दिसल्या. जोहान्सबर्गमध्ये जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतच्या हलक्या-फुलक्या गप्पांमधून लक्ष वेधून घेतले. दोन्ही नेते एकमेकांना शुभेच्छा देताना एका सहज व मनमोकळ्या क्षणी दिसले. या शिखर परिषदेदरम्यान मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना आपुलकीने मिठी मारतानाही दिसले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा