Saturday, November 22, 2025

जात

जात

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड

“मालू, फडक्यांचा नकार आला गं!” अप्पांचा आवाज व्यथित होता. “का हो अप्पा? जाताना तर साखरपुड्याची तारीख लवकरच ठरवू, असं म्हणाले होते.” “अगं नंदाच्या लग्नाबद्दल त्यांना समजलं, की जातपात माहीत नसलेल्या मुलासोबत मी तिचं लग्न लावून दिलं, ते त्यांना पसंत पडलं नाही. आता ठरवून करायच्या लग्नात लोक कसा विचार करतात हे आपल्याला कळत नाही ना मालू!” अप्पांचे हळवे डोळे भरले.

खरे तर नंदाचा नवरा अनाथ होता. लहानपणापासून अप्पांनी लाडाकोडात वाढवला होता. नंदाशी त्याचे लग्न अप्पांनीच लावून दिले होते. शुद्ध भाषा बोलणारा, एमएससी झालेला नंदाचा नवरा त्यांचा अभिमान होता. नंदाचा नवरा शारीव! तो म्हणाला, “अप्पा मी प्रयत्न करू का? मालूच्या भावी सासरशी? तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे.” “चालेल. एवी तेवी ते नाही म्हणालेच आहेत. तू प्रयत्न करून बघ. तूच यावर तोडगा काढू शकशील.” अप्पा म्हणाले. “शुभस्य शीघ्रम.” नंदाचा नवरा शारीव म्हणाला, “आताच जातो नि होकार घेऊन येतो.” “शारीव, इतका आत्मविश्वास आहे तुला?” “हो आहे. जात ही जन्माने नव्हे, जगण्याने सिद्ध होते. हे मला त्यांना जाणवून द्यायचं आहे अप्पा!” आणि निघाला की तो!... शारीव फडक्यांच्या घरी पोहोचला. गेल्या गेल्या श्रीयुत आणि श्रीमती फडके यांना त्याने वाकून नमस्कार केला. फडके दांपत्य जरा सुखावले, पण त्यांच्या मनातले आश्चर्य ओसरत नव्हते. “मी मालूचा भाऊ! तिची बहीण नंदाचा पती! अप्पांनीच मला लहानाचा मोठा केला. खूप शिक्षण दिले. अप्पांचे आणि आईचे न फिटणारे ऋण माझ्यावर आहेत. पण मलाच माझी जात ठाऊक नाही आणि जात जन्माने नव्हे, तर जगण्याने सिद्ध होते, यावर माझा विश्वास आहे. मी गीता पठण करतो, संस्कृत शिकतो, एमएससीला पहिला वर्ग मिळवला, हे सारे अप्पांचे आणि आईचे उपकार! सारी त्यांची मायेची सावली.” त्याने ओलावलेले आपले डोळे पुसले. मग म्हणाला, “मी अनाथ आहे हा माझा गुन्हा आहे का हो काका?

आईला ‘नकोसे’ झालेले अपत्य एवढीच माझी कर्मकहाणी आहे. नाहीतर तिने मला आश्रमात सोडलेच नसते. पण अप्पांनी मला घरी आणले, संस्कार दिले, शिक्षण दिले आणि अगदी मुलासारखे वाढवले आपल्या! कधी फरक केला नाही आपल्या दोघी मुलीत आणि माझ्यात. कधीच नाही. मीही जागलो त्यांच्या प्रेमाला. गीता, १२वा, १५ वा अध्याय पाठ केला. ‘मेघदूत’ पाठ केला. “यत्र योगेश्वर: कृष्ण, तत्र पार्थो धनुर: तत्र श्री विजयोद्भूती ध्रूवा नी मतिर मम.” हे वचन मला ज्ञात आहे. अंगी हुषारी आहे.

वृत्तीत शुद्धता आहे आणि मनभर निर्मलताच आहे. मला जातीपातीचे लेबलच मान्य नाही. कृपा करा हे शुभलग्न होऊ द्या. नाहीतर मी कायमचा निघून जाईन. अदृश्य होईन. कदाचित् या जगात नसेन.” नि तो डोळे पुसत राहिला. श्रीयुत आणि श्रीमती फडके गहिवरले. ती काही दुष्ट माणसे नव्हती. “अरे शारीव, आम्ही चांगली माणसे आहोत. ‘जात’ ही काही जन्माने सिद्ध होत नाही! ती जगण्याने सिद्ध होते, यावर आम्हा दोघांचा विश्वास आहे. आज तो अधिक दृढ झाला शारीवा! तू त्यास जबाबदार आहेस.” फडके दांपत्याने ओलावलेले डोळे निपटले. “जा, जाऊन सांग मालूच्या पिताश्रींना! मुहूर्त काढा म्हणावे योग्य तो!” “खरंच?” शारीव खूप आनंदला. त्याने आपले भरलेले डोळे पुसले. “नमस्कार करतो काका-काकू.” तो पुन्हा वाकला. अगदी मनापासून! “शुभम् भवतु” दोघांनी आशीर्वाद दिला. “शारीव!” “काय काका?” “आज तू आमचे डोळे उघडलेस.” “ते कसे?” “अरे जग कुठे चालले आहे? आणि आमच्या जातीपातीच्या जुनाट बुरसट कल्पना! नाही रे! जगात दोनच जाती शिल्लक आहेत! वाईट माणसे अन् चांगली माणसे! आणि आम्ही दोघे नि आमचा एकुलता पुत्र, ही चांगलीच माणसे आहोत. जा, मुहूर्त जवळचा शोधा म्हणावे.” शारीव आनंदे परतला.

Comments
Add Comment