मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी, निळजे-दातिवलीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २५ आणि ३० नोव्हेंबर, २ आणि ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.१० दरम्यान असणार आहे.
निळजे-दातिवली दरम्यान २५ आणि ३० नोव्हेंबर, २ आणि ७ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे मंगळूरू – सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस कळंबोली येथे ५० मिनिटे थांबविण्यात येईल. ३० नोव्हेंबर आणि ७ डिसेंबर रोजी दौंड – ग्वाल्हेर अतिजलद एक्स्प्रेस कर्जत – कल्याण – वसई रोड मार्गे वळविण्यात येतील आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याण येथे थांबा देण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
विभागातील लोणावळा – बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
ब्लॉक कालावधीत लोणावळा – बीव्हीटी यार्डमधील यार्ड पुनर्रचना व इतर पायाभूत कामे करण्यात येणार आहेत. २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.२५ ते सायंकाळी ६.२५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे जोधपूर – हडपसर एक्स्प्रेस कर्जत येथे ४५ मिनिटे थांबवण्यात येणार आहे. सीएसएमटी – चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे एक तास, एलटीटी – मदुराई एक्स्प्रेस भिवपुरी रोड येथे १० मिनिटे, सीएसएमटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, सीएसएमटी – हैदराबाद एक्स्प्रेस लोणावळा येथे १० ते १५ मिनिटे थांबवण्यात येतील. तर, २७ नोव्हेंबर रोजी एलटीटी – काकीनाडा एक्स्प्रेस भिवपुरी रोड येथे १० मिनिटे थांबवण्यात येईल. २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी – होस्पेट एक्स्प्रेस सीएसएमटीवरून उशिरा सुटेल.






