Friday, November 21, 2025

चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावात जनआक्रोश!

चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावात जनआक्रोश!

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचा निषेध तसेच मारेकऱ्यास तत्काळ फाशी द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी मालेगाव शहर व तालुका भागात उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.

येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त आंदोलक बिथरल्याचे बघावयास मिळाले. त्यातून त्यांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. जागोजागी रस्त्यांवर जाळ्या लावून वाहतूक वळविण्यात आली होती.

साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्याचा प्रकार मालेगावपासून ३० किलोमीटर अंतरावरील डोंगराळे गावात गेल्या रविवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणी विजय खैरनार (२४) या संशयिताला पोलिसांनी लगेचच अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. या कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते; परंतु न्यायालय परिसरात जमलेल्या संतप्त जमावाचा अवतार बघता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती निर्माण झाल्याने पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे त्याला न्यायालयापुढे सादर केले. न्यायालयाने आरोपीला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत चिमुकलीला श्रद्धांजली व संशयिताला तत्काळ फासावर लटकवावे, या मागणीसाठी शुक्रवारी मालेगाव शहर व तालुका भागात बंदचे आयोजन करण्यात आले. शहरातील हिंदू-मुस्लीम अशा सर्वच भागात अभूतपूर्व व कडकडीत बंद पाळण्यात आला.

येथील रामसेतू पुलापासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. रामसेतू पुलावरून नागरिकांनी मोर्चा काढला आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या मोर्चात हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. यावेळी चिमुकलीचा बदला फाशी अशी मागणी करण्यात आली. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरासह ग्रामीण भागातील महिला, पुरुषांची व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर मोर्चात सामील झाले. या मोर्चातील उपस्थितीमुळे रस्त्यांवर जनसागर उसळल्याचे चित्र दिसत होते. न्याय द्या, न्याय द्या, चिमुकलीला न्याय द्या तसेच नराधमाला तत्काळ फाशी द्या, अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. मोर्चेकऱ्यांच्या हातात चिमुकली हत्येच्या निषेधाचे फलक घेण्यात आले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

मोर्चा संपल्यानंतर अचानक जमाव आक्रोशीत झाला. मोर्चात सामील झालेल्या काही आंदोलकांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच असलेल्या न्यायालयाच्या आवारात प्रवेश केला. घोषणाबाजी करत त्यांनी न्यायालयाच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या जमावाने न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या दरवाजावर चप्पल फेकून मारण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांविरोधात बळाचा वापर व सौम्य लाठीचार्ज करत बिथरलेल्या आंदोलकांना तेथून पांगवण्यात यश मिळवले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जमावाला न्यायालय परिसरातून बाहेर काढले.

बिथरलेल्या आंदोलकांचा न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, न्यायालयासमोर ठिय्या आंदोलन, मारेकऱ्यास फाशी देण्याची मागणी, मालेगाव शहर व तालुका भागात कडकडीत बंद

नेमके काय घडले?

१६ नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावात ही अमानुष घटना घडली. घराच्या अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलीला गावातीलच विजय संजय खैरनार (वय २४) याने चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले. गावातील एका टॉवरजवळ त्याने चिमुकलीवर अत्याचार केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून तिची हत्या केली. मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. धक्कादायक म्हणजे आरोपीही या शोधामध्ये सहभागी झाला होता, जे नंतर तपासात उघड झाले. दरम्यान, एका महिलेने आरोपीला मुलीसह टॉवरकडे जाताना पाहिल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर शिक्षेसाठी स्थानिक नागरिक आणि कुटुंबीय आक्रमक झाले आहेत.

डीवायएसपींना निलंबित करण्याची दादा भुसे यांची मागणी

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही मोर्चात उपस्थित राहून नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, ‘हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे. मालेगाव वकील संघाने आरोपीची बाजू न्यायालयात कोणीही मांडणार नाही, असा निर्णय घेतला आहे, ही समाजाची शक्ती आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपलेली असताना डीवायएसपींनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, हा प्रकार निषेधार्ह आहे. अशा अधिकाऱ्याला तातडीने निलंबित केले पाहिजे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >