Saturday, November 22, 2025

रायगडमध्ये निवडणूक रिंगणात वारसदारांचीच चलती

रायगडमध्ये निवडणूक रिंगणात वारसदारांचीच चलती

राजकीय गड सांभाळण्यासाठी राजकारणात लेकी-सुनांचा सहभाग

सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या रिंगणात दोन लेकी, दोन सुना आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. यामध्ये अलिबागमधून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईक, मुरुडला माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकरांची कन्या आराधना नाईक, पेणमध्ये आमदार रवींद्र पाटील यांची सून प्रीतम पाटील आणि कर्जतला माजी आमदार सुरेश लाड यांची सून डॉ. स्वाती पाटील निवडणुकीत उतरल्या आहेत.

अलिबाग नगरपालिकेत शेकाप, काँग्रेस आघाडीतर्फे अक्षया प्रशांत नाईक या प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या कन्या आहेत, तर माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक यांची नात आहे. नाईक घराण्याचे अलिबाग नगरपालिकेवर नेहमीच प्राबल्य राहिलेले आहे. त्यामुळे नाईक परिवाराच्या वारसदार म्हणूनच अक्षया यांच्याकडे पाहिले जाते. शिवाय राजिपच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या त्या भाची आहेत. पाटील, नाईक परिवाराचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. शेकापचे पाठबळ आणि काँग्रेसची साथ त्यांना मिळणार आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना, भाजपतर्फे तनुजा पेरेकर या उभ्या आहेत. यापूर्वी त्या शिवसेनेतर्फे नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या आहेत. तिसऱ्या अपक्ष उमेदवार कविता ठाकूर यांनीही अर्ज दाखल केलेला आहे. अलीकडेच त्यांनी आणि प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांचा राजकीय वारसा त्यांनाही लाभला आहे. यापूर्वीही त्यांनी नगरसेविका म्हणून काम पाहिलेले आहे.

मुरुड नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांचे प्रभुत्व राहिलेले असून, दांडेकर परिवाराचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा झालेला आहे. यावेळी मुरुडचे नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असल्याने हीच संधी साधत मंगेश दांडेकर यांनी आपली सुकन्या आराधना दांडेकर यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपल्या वारसदारासाठी राजकारणाचे दरवाजे खुले केलेले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे कल्पना पाटील या उभ्या आहेत. यापूर्वीही त्यांनी नगराध्यक्ष म्हणून चांगले काम केलेले आहे. त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. यामुळे मुरुडला तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. पेण नगरपालिकेवर गेल्या काही वर्षात आमदार रवीशेठ पाटील यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवलेले आहे. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी आपल्या स्नुषा प्रीतम पाटील यांना नगराध्यक्षपदी विराजमान केलेले होते. आता सुद्धा भाजपतर्फे त्याच पुन्हा मैदानात उतरलेल्या आहेत. सासऱ्यांची राजकीय पुण्याई, कुटुंबाचे पाठबळ, भाजपची साथ या जोरावर त्या भविष्य अजमावित आहेत. त्यांच्या विरोधात शहर विकास आघाडीतर्फे रिया धारकर यांना उतरविण्यात आलेले आहे. रिया धारकर यांनी यापूर्वीही पेणचे नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. रिया धारकर या माजीमंत्री स्व. प्रभाकर तथा आप्पासाहेब धारकर यांच्या स्नुषा आहेत. कधीकाळी रविशेठ पाटील आणि आप्पा धारकर हे परस्परांच्या विरोधात उभे ठाकलेले होते. तीच परंपरा आताही दिसून येत आहे.

कर्जतमध्ये भाजपाने डॉ. स्वाती लाड यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेले आहे. स्वाती लाड या माजी आमदार सुरेश लाड यांच्या स्नुषा आहेत. सुरेश लाड यांनी कर्जतचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचाही राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा झालेला आहे. सध्या ते तसे राजकीय घडामोडींपासून काहीसे अलिप्त आहेत. पण आता सुनबाईच रिंगणात उतरल्याने सासरेबुवाही प्रचारात उतरल्याचे दिसत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेने पुष्पा तगडे यांना उमेदवारी दिलेली आहे. विशेष म्हणजे तगडे या माजी नगरसेविका आहेत. महाड नगरपालिकेतही निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना विरोधात राष्ट्रवादी, भाजप अशी युती झालेली आहे. शिवसेनेने माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांना उमेदवार दिली आहे, तर राष्ट्रवादीने सुरेश कळमकर यांना रिंगणात उतरविले आहे. कविस्कर हे काँग्रेस, शिवसेनेकडून नगराध्यक्ष झालेले आहेत. गेली तीन दशके ते महाडच्या राजकारणात सक्रिय आहेत. यामुळे या लढतीकडे महाडचे लक्ष लागलेले आहे.

Comments
Add Comment