महायुतीचे उमेदवार आले आमने-सामने
गणेश पाटील पालघर/ वाडा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. तर पालघर, जव्हार आणि वाडा येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची संख्या जास्त असली तरी ,या ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात आहेत. डहाणू येथे भाजपच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र मुठ्ठ बांधली आहे.
जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण करण्यात आली आहे. पालघर, वाडा आणि डहाणू येथे नगराध्यक्ष पदाच्या काही उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे. जव्हार येथे मात्र नगराध्यक्षपदाचा एकही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला नाही.
पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट शिवसेना उभाठा गटाच्या तीन उमेदवारांमध्ये प्रामुख्याने तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. माजी नगराध्यक्षांचे पती केदार काळे यांचा आणि प्रशांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात नेतेमंडळींना यश आले आहे. येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपकडून कैलास म्हात्रे, शिवसेना शिंदे गट उत्तम घरत आणि शिवसेना उभाठा गटाकडून उत्तम पिंपळे निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसकडून प्रीतम राऊत यांची उमेदवारी कायम असल्याने महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा या ठिकाणी फूट दिसून आली आहे.
राहुल ठाकरे आणि जावेद लुलानिया हे देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगरसेवक पदाच्या तब्बल १९ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पालघर मधील प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रत्येक तीन उमेदवार निवडणूक लढवित असून, इतर प्रभागांमध्ये मात्र एका जागेसाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
डहाणूत नगराध्यक्ष पदासह प्रभागांमध्येही सरळ लढती डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत सिंह राजपूत यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माछी यांना महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी संजय पाटील आणि हाफिजूर रहमान खान यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होत आहे. विशेष बाब म्हणजे डहाणू येथील प्रभाग क्रमांक दोन, तीन, पाच, सात, अकरा आणि बारा या प्रभागांमध्ये नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये सुद्धा थेट लढत होणार आहे. इतर प्रभागांमध्ये सुद्धा एका जागेसाठी तीन किंवा चार यापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवत नसल्याचे चित्र या ठिकाणी आहे.
वाड्यात नगरसेवक पदाच्या ७ अपक्ष उमेदवारांचा अर्ज मागे वाड्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रिद्धी भोईर व रंजिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर नगरसेवक पदाच्या ७ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या २ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी ७ वैध उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार रिध्दी भोईर व रंजिता पाटील तसेच अपक्ष उमेदवार ज्योती आघाव या तिघींनी अर्ज मागे घेतल्याने आता नगराध्यक्ष पदाकरिता ४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर १७ प्रभागांमध्ये नगरसेवक पदाकरिता ७४ वैध उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी प्रभाग क्रमांक २ मधून सुनिता जाधव, प्रभाग क्रमांक ९ जोया शेख, प्रभाग क्रमांक १० मधून रोहन पाटील, प्रभाग क्रमांक १२ कुणाल साळवी, प्रभाग क्रमांक १३ अजहर शेख, प्रभाग क्रमांक १५ मधून ज्योती आघाव, प्रभाग क्रमांक १६ विराज पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १७ प्रभागात ६७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपले बळ कोणाच्या पाठीशी उभे करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जव्हारमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रेखा दोडे, नुरी पठाण यांच्यासह,भाजपकडून पूजा उदावंत, शिवसेना शिंदे गटाकडून पद्मा राजपूत, राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून रश्मीमन मणियार या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या ठिकाणी पाच उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील ब जागेसाठी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने या ठिकाणी आता चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग ९ मधील ब जागेसाठी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी पाच तर प्रभाग क्रमांक दहा अ मधील एका उमेदवाराने माघार घेतली. २० जागांसाठी एकूण ७४ उमेदवार या निवडणुकीत उभे होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ६९ उमेदवार रिंगणात आहेत.






