नवी मुंबई : सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ४ हजार ५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली असून शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील ४ हजार ५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
या योजनेंतर्गत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित ४ हजार ५०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण ४,५०८ सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता १,११५ तर अल्प उत्पन्न गटाकरिता ३,३९३ सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. २.५० लाख अनुदान उपलब्ध आहे.
सदर योजनेतील सदनिका या तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. सदनिकेच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून सुरू होणार आहे. दि. २१ डिसेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. उपरोक्त कालावधीमध्ये, लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.






