बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता आणी”ची खास स्क्रीनिंग अथर्व ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आली. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही भूमिकांमध्ये वर्षा राणेनी आपल्या विद्यार्थ्यांसह ही फिल्म साकारत एक आगळी कलाकृती सादर केली. मुलांच्या कल्पक विचारांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने भावनिक आणि रोचक मांडणीमुळे पाहणाऱ्यांना गुंतवून ठेवले. वर्षा राणेची स्क्रीनवरील उपस्थिती, अभिनय आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन विशेषत्वाने उल्लेखनीय ठरलं. सर्वांनी चित्रपटाची आणि वर्षा राणेंच्या योगदानाची प्रशंसा करत, ही कलाकृती मुलांच्या कलेला दिलेली सकारात्मक दिशा असल्याचं नमूद केलं. कार्यक्रमादरम्यान वर्षा राणे म्हणाल्या, “आम्हाला या फिल्मद्वारे मुलांना त्यांची कल्पनाशक्ती मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ द्यायचं होतं. त्यांच्या या प्रवासातून त्यांनी स्वतःला नव्या रूपात ओळखलं आहे.” या सोहळ्याने ऑल प्ले प्रोडक्शन्स आणि मुंबईतील अथर्व युनिव्हर्सिटी यांच्यातील सर्जनशील सहकार्यास आणखी बळकटी मिळाली.






