मुंबईतील स्वच्छतागृह होणार चकाचक आणि दुर्गंधीमुक्त
सचिन धानजी मुंबई : मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची डागडुजी तसेच सुधारणा केल्यानंतर आता याची देखभाल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने वस्ती पातळीवर अशासकीय संस्थांची नेमणूक केली जात आहे. यासाठी सुमार १७०० संस्थांची नेमणूक केली जाणार असून यामुळे आता स्थानिक पातळीवरील म्हाडासह इतरांच्या ताब्यातील शौचालये स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त दिसणार आहेत.
मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये आरसीसी पध्दतीचे तळमजला, तळ अधिक एक आणि तळ अधिक दोन मजल्यांची सामुदायिक शौचालयांची उभारणी केली जात आहे.येथे विविध ठिकाणी कंत्राटदारांमार्फत टप्पा एक ते टप्पा ११मध्ये १७४५ सामुदायिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून यांच्या देखभालीसाठी अशासकीय संस्थांची नेमणूक करण्यात येते. मात्र स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार म्हाडा व इतर सामुदायिक शौचालयांंकरता वस्ती पातळीवर अशासकीय संस्थांची नेमणूक करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार म्हाडा आणि इतर सामुदायिक शौचालयांच्या दैनंदिन कामकाजासाठी व दैनंदिन देखभालीसाठी संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तत्कालिन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही अशाप्रकारचे निर्देश दिल्यामुळे मुंबईतील म्हाडा व इतर सामुदायिक शौचालये जी महापालिकेला हस्तांतरीत झाली आहेत, त्याच्या देखभालीसाठी अशासकीय संस्थेची नेमणूक करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार म्हाडाकडून हस्तांतरीत झालेल्या ३८३० शौचालयांच्या देखभालीसाठी वस्ती पातळीवर १४७० संस्था नियुक्त केल्या केल्या जाणार आहेत. तर इतर ४७९ शौचालयांच्या देखभालीसाठी १९६ संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे त्यातील ७ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येत आहे.






