मुंबई : नाशिक शहरात आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा प्रादुर्भाव आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील एका मृत वराहाचा नमुना भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी अॅनिमल डिसीज येथे पाठवण्यात आला होता. तपासणीत नमुन्यात आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाथर्डी येथील महापालिकेच्या खतप्रकल्पाजवळील एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.तपासणीनंतर लगेचच जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि महापालिकेला रोग नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अलीकडे वराहांच्या (डुक्करांच्या) मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्याने प्रशासनाने मृत प्राण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर बाधित आणि त्यालगतचा दहा किलोमीटर परिसर 'निरीक्षण क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच रोग प्रतिबंधासाठी बाधित क्षेत्रातील एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व वराहांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित भागात सक्रिय निरीक्षण आणि जैवसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वराह मांस विक्री करणाऱ्या सर्व आस्थापनांची नोंदणी करून त्यांच्यावर स्थानिक पशुवैद्यकांकडून नियमित तपासणी करण्याचे आदेश आहेत. तसेच मोकाट वराहपालन पूर्णपणे बंद करण्यास सुचना देण्यात आल्या आहेत.
हा रोग झुनोटिक म्हणेजच प्राण्यांमधून माणसांमध्ये येत नाही. हा रोग फक्त आजारी वराहांपासून इतर वराहांमध्ये गेल्यास त्यांच्यामध्ये झपाट्याने संसर्ग पसरतो. मात्र जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग याबाबत अलर्ट मोडवर असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रकारचे खाद्य देणे पूर्णपणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






