Thursday, November 20, 2025

जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध हॅट्ट्ट्रिक

जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध हॅट्ट्ट्रिक

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम!

जामनेर : जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मंगळवारी ता. १८ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेकांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरविण्यात आले. या प्रक्रिये दरम्यान भाजपाचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहे. यात भुसावळ येथे वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ (ब) मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध झाल्या आहेत.

जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी अनेक मातब्बरांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. दरम्यान, मतदान होण्या आधीच भाजपाने जिल्ह्यात तीन ठिकाणी खाते उघडून आघाडी घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाचे खाते उघडून विरोधकांची झोप उडवून लावली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानातून राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली. साधना महाजन यांच्या विजयासह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे.

जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी बिनविरोध हॅट्रिक साधली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात नवा अध्याय निर्माण झाला आहे. जामनेर नगरपरिषदेच्या मतदानापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन या बिनविरोध निवडून आल्याने आता जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. त्यामुळे सध्या जामनेरमध्ये महाजन कुटुंबासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा केला जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर व सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक पदाचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे बिनविरोध झालेल्या तीनही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या तीन जागांवर भाजपला बिनविरोध जागा मिळविण्यात  यश  मिळाले  आहे.

Comments
Add Comment