नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जावून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ तास चर्चा झाली असून शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाराजीनाट्याच्या घडामोडी सुरू आहेत. भाजपकडून शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांना जो पक्षप्रवेश देण्यात आला, त्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. तसेच अनेक ठिकाणी शिवसेनेच्या मंत्र्यांना आव्हान देणाऱ्या राजकीय नेत्यांना भाजपने प्रवेश देत बळ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या पक्षप्रवेशांवर शिवसेनेच्या मंत्र्यांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत त्यावर तोडगा काढला. आता सत्ताधारी महायुतीच्या पक्षांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी फोडायचे नाहीत, असे ठरले. पण यानंतरही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नसल्याने एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी शहा यांच्या भेटीत कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त केलेली नाही. तसेच तक्रारही केलेली नसल्याचे सांगितले. तसेच, मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत, तुम्ही पतंग उडवता. युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असे मुद्दे शिंदेंनी शह यांच्यापुढे दिल्ली भेटीत मांडले.
अभिनंदन करण्यासाठी भेट, मी रडणारा नाही तर लढणारा आहे
बिहारच्या यशाबाबत अभिनंदन करण्यासाठी ही भेट होती. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर आम्ही दिल्लीत चर्चा करत नाही. चव्हाण यांच्याबाबत निर्णय त्यांचे पक्षश्रेष्ठी घेतील. अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेत नाराजीचा विषय नव्हता. तक्रारींचा पाढा वाचून मी रडणारा नाही तर लढणारा आहे. महायुतीला गालबोट लागेल असे आम्ही करणार नाही. मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शहा यांच्या भेटीत शिंदे यांच्याकडून नाराजी व्यक्त?
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ऑपरेशन लोटस राबवले जात असल्याची खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला, त्यांना पक्षप्रवेश देत भाजपने त्यांची ताकद वाढवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीत लढवल्या जातील, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. पण सध्या राज्यात अनेक ठिकाणी भाजपने वेगळी चूल मांडल्याचे बघायला मिळाले आहे. त्यावरूनही एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.






