Thursday, November 20, 2025

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल यंदा लवकरच लागली आहे. मुंबईत नेहमी डिसेंबरमध्ये थंडी जाणवते. पण यंदा नोव्हेंबरमध्येच गारठा पडला आहे. सांताक्रूझ वेधशाळेत आज सकाळी १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. या तापमानाने मागील अकरा वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे. याआधी राज्यात २०१६ मध्ये १६.४ किमान तापमानाची नोंद झाली होती. या काळातील नेहमीचे २१ अंशांच्या आसपासचे तापमान यंदा तब्बल पाच अंशांनी घसरल्याने शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे.

मुंबईसह इतर उपनगरांमध्येही थंडीची तीव्रता अधिक वाढली आहे. बदलापूरमध्ये तापमान ११ अंशांपर्यंत खाली गेले आहे. महाबळेश्वरसारखी थंडी या भागात जाणवत होती. सकाळपासून मुंबईत धुरकट वातावरण दिसत असून, हवेतल्या प्रदूषणामुळे AQI सुमारे १७० च्या स्तरावर पोहोचला आहे. यामुळे थंडीसोबतच हवेची गुणवत्ता खालावण्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे.

यंदा नोव्हेंबरपासूनच तापमानात जलद घट होण्यामागे विविध हवामान घटक कारणीभूत आहेत. उत्तर आणि मध्य भारतातून येणारे थंड व कोरडे वारे महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने तापमान खाली येत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांच्या प्रभावामुळे वातावरणातील आर्द्रता कमी झाली असून, हवेतला बाष्प जलदगतीने कमी झाल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. मान्सूनचा पूर्णत: परतावा झाल्यानेही वातावरणात बदल दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे आगामी दिवसांत तापमानात आणखी घट होऊ शकते.

राज्यातील विविध शहरांमध्येही किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. सांताक्रूझमध्ये १६.२ अंश, कुलाब्यात २१.६ अंश, बदलापूरमध्ये ११ अंश, तर पुण्यात ९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. लोणी काळभोरमध्ये तापमान ६.९ अंशांपर्यंत खाली गेले असून, हे राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. राज्यभरातील या कमी तापमानामुळे नागरिकांना हिवाळ्याचा कडाका जाणवू लागला आहे.

Comments
Add Comment