Wednesday, November 19, 2025

नाशिकमध्ये आघाडी आणि युतीतही खो!

नाशिकमध्ये आघाडी आणि युतीतही खो!

जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमने-सामने आले आहेत. भाजप पाच ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आणि शिवसेना

(उबाठा)हे पक्ष तीन ठिकाणी एकमेकांविरोधात आहेत. भाजप आणि शिंदेसेना हे दोन पक्ष तीन ठिकाणी, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्रितपणे दोन ठिकाणी लढत आहेत. याशिवाय, काही ठिकाणी शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) एकत्रित आले आहेत. एका ठिकाणी तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) एकत्र आले आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी, ओझर, सिन्नर, सटाणा आणि चांदवड या पाच नगर परिषदांमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. त्यांच्या विरोधात महायुतीमधील शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) हे पक्ष रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी शिंदेसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे भाजपच्या विरोधात असल्याचे चित्र असून, काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले आहेत. इगतपुरीमध्ये भाजपच्या विरोधात शिंदेसेना व राष्ट्रवादी (अ.प.) हे एकत्रितपणे लढत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्षही येथे एकत्रित लढत देत आहेत. नांदगावमध्ये भाजप आणि शिंदेसेना एकत्र असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) त्यांच्या विरोधात उभा ठाकला आहे. भगूरमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या (अ.प.) गटाशी हातमिळवणी केली आहे. येथे उबाठासेनेला मनसेने साथ दिली आहे. तसेच शिंदेसेनाही स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे येथील लढत ही चुरशीची ठरणार आहे. मनमाडच्या नगर परिषदेमध्ये भाजपने शिंदेसेना आणि रिपाइंला आपल्या साथीला घेतले आहे. या युतीला राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) आणि उबाठासेनेचे उमेदवार विरोधात आहे. मनमाड शहरामध्ये रिपाइंची ताकद आहे. त्यामुळे या युतीचा लाभ किती मिळणार हे बघितले जात आहे. येवला शहरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) एकत्र असून, येथे शिंदेसेनेने राष्ट्रवादीच्या (श.प.) गटाला सोबत घेतले आहे. त्यामुळे वेगळेच समीकरण रंगणार आहे. त्यामुळे येवल्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

जिल्ह्यातील त्र्यंबक, सिन्नर, सटाणा आणि चांदवड या चार ठिकाणी सर्वच पक्ष एकमेकांना शह देत आहेत. येथे सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याला प्राधान्य दिले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) आणि शिंदेसेना यांनी आधी युती जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी ही युती तोडत शिंदेसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी मिळाली नाही ते अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वत्र चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

येवला, सिन्नर, मालेगावला भाजपची ताकद वाढली

येवल्यात उबाठा नेते, माजी आमदार मारुती पवार आणि संभाजी पवार, तर मालेगावमधील ज्येष्ठ नेते माजी आ. अपूर्व हिरे यांच्यापाठोपाठ अद्वय हिरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही तालुक्यात पक्षाची ताकद वाढली आहे. येवल्यात माणिक शिंदे यांनी आ. किशोर दराडे यांना साथ दिली आहे. काही दिवसांपूर्वीच सिन्नरमधून विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते, माजी नगर अध्यक्ष हेमंत वाजे आणि युवा नेते उदय सांगळे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपची वाट धरल्याने नगर परिषद पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपचा रस्ता सोपा झाला असल्याचे बोलले जात आहे.

ओझर, पिंपळगावकडे लक्ष

ओझरला प्रथमच नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असलेल्या ओझरमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे येथे बहुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहेत. पिंपळगाव बसवंत येथे भाजप व शिंदेसेना एकत्र असून, त्याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) तसेच काँग्रेस उमेदवार रिंगणात आहेत. स्थानिक पातळीवर निर्णय

राज्यात जरी सत्ताधारी महायुती आणि महाआघाडी असली तरी स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती आणि आघाडी न झाल्यामुळे याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर देखील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे; परंतु निवडणुकीनंतर मात्र पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी होऊन आम्हीच नंबर एक असा पुन्हा दावा केला जाऊ शकतो.

- धनंजय बोडके

Comments
Add Comment