ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये
नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून 'केंद्रीय मोटार वाहन नियम' अंतर्गत देशभरातील वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात बदल करण्यात आला असून, यामुळे, वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात जवळपास १० पट वाढ झाली आहे. हे नवीन शुल्क दुचाकी, तीन चाकी, क्वाड्रिसायकल, हलकी मोटार वाहने, मध्यम आणि जड वस्तू/प्रवासी वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांना लागू होतात. ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० करण्यात आला आहे. पूर्वी १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी असेल तरच फिटनेस टेस्टसाठी जास्त फी आकारली जात होती. मात्र नवे नियम लागू झाल्यानंतर गाडी १० वर्षांची झाली की वाढीव फी लागू होणार आहे. नवीन व्यवस्थेनुसार गाड्यांना तीन गटांमध्ये विभागण्यात आले असून, १० ते १५ वर्ष, १५ ते २० वर्ष, २० वर्षांपेक्षा जास्त गाडीचे वय वाढेल तसा फिटनेस टेस्टचा खर्चही वाढत जाणार आहे.
या नवीन नियामांचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे उच्च फिटनेस शुल्क लागू करण्यासाठी वाहनाच्या वयाचे निकष १५ वर्षांवरून १० वर्षे करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वाहनांनाही आता वाढीव शुल्क आकारले जाईल. सरकारने आता वाहनांच्या वयानुसार (१० ते १५ वर्षे, १५ ते २० वर्षे आणि २० वर्षांपेक्षा जास्त) शुल्क आकारण्यासाठी तीन वेगवेगळ्या श्रेणी लागू केल्या आहेत. वाहनाचे वय वाढत असताना, शुल्क त्या प्रमाणात वाढेल, १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना एकच शुल्क लागू करण्याच्या मागील पद्धतीपेक्षा वेगळे.
दोन चाकीपासून ट्रकपर्यंत सर्व वाहनांसाठी दर वाढले असून, २,५०० वरून थेट २५,००० रुपये करण्यात आल्याने हा सर्वात मोठा धक्का व्यावसायिक वाहनांना बसणार आहे. यात २० वर्ष जुने ट्रक/बस २,५००-२५,०००रुपये, २० वर्ष जुने मीडियम कमर्शियल वाहन असेल तर १,८००-२०,००० रुपये असेल. २० वर्ष जुने लाइट मोटर वाहनाला १५,००० रुपये तर २० वर्ष जुनी ऑटोरिक्षा ७,००० रुपये आकारले जाणार आहे. २० वर्ष जुनी मोटरसायकल ६००- २,००० रुपये, १५वर्षांखालील गाड्यांचीही फी वाढली असून, यात मोटरसायकल ४०० रुपये, लाइट मोटर वाहन (LMV) ६०० रुपये, मीडियम/हेवी कमर्शियल वाहनासाठी १,००० रुपये आकारले जाणार असून, ही फीही आधीपेक्षा जास्त आहे.






