Tuesday, November 18, 2025

पनवेल महानगरपालिकेच्या १४ प्रभागांसाठी फेर सोडत

पनवेल महानगरपालिकेच्या १४ प्रभागांसाठी फेर सोडत

सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पूर्ण

पनवेल : राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशांनुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी १४ प्रभागांचा समावेश करून फेर सोडत काढण्याचे व त्या अानुषंगाने सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जागा नेमून देण्याबाबत पनवेल महापालिकेकडून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले. पनवेल महापालिकेच्या सन २०२५मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत निश्चित करण्याची प्रक्रिया ११ नोव्हेंबर रोजी पार पडली होती.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार, एकूण १४ प्रभागामधील (प्रभाग क्र. १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, १३, १४, १६, १९, २०) जागांचा समावेश करुन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिलांच्या ६ जागांची सोडत काढण्याची कार्यवाही शासनाने दि. २० मे, २०२५ रोजी प्रसिध्द केलेल्या नियमातील तरतुदीनुसार करण्याचे आदेश दिले होते. तसेच सर्वसाधारण महिलांच्या जागांचे आरक्षण देखील नियमानुसार नेमून देण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार आज सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग ९- ब, प्रभाग १२-ब, प्रभाग १५-ब, प्रभाग १७-ब, प्रभाग १८-अ, या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांकरिता थेट आरक्षित करण्यात आल्या. तसेच आजच्या सोडतीमध्ये प्रभाग १-अ, प्रभाग २-अ, प्रभाग ३-ब, प्रभाग १३ -ब, प्रभाग १६ -अ, प्रभाग १९ - अ या जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांकरिता आरक्षित झाले.

प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना १९ नोव्हेंबरपासून स्वीकारणार

सुधारित प्रारूप आरक्षणावरती नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचना १९ नोव्हेंबर २०२५ पासून स्वीकारल्या जाणार आहेत. या हरकती २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. हरकती दाखल करण्यासाठी मुख्यालयात व्यवस्था हरकती व सूचना दाखल करण्यासाठी इच्छुकांनी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात (नागरी सुविधा केंद्र) लेखी अर्ज दाखल करावेत.

Comments
Add Comment