Tuesday, November 18, 2025

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार स्थापनेत व्यस्त आहे आणि तिकीट वाटपाच्या सूत्रानुसारच मंत्रीपदांचे वाटप करण्याची योजना आखत आहे. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, तर भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष यांना प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. भाजपला कॅबिनेट मंत्रीपदांचा सर्वाधिक वाटा मिळण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर जेडी-यू व इतर लहान एनडीए मित्रपक्षांना स्थान मिळेल.

बिहार विधानसभा निवडणूक निकालात एनडीएने घवघवीत यश मिळवले असून विरोधकांचा मोठा पराभव या निवडणुकांमध्ये झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे विरोधी गोटात नेमके कुठे चुकले याबाबत चर्चा-आरोप होऊ लागले असताना दुसरीकडे सत्ताधारी गोटात पुढील सरकार कसे स्थापन करावे? कुणाला काय आणि किती मिळावे? याविषयी खल होऊ लागले आहेत. सत्तेतील वाट्याबाबतची जोरदार चर्चा होत असताना भाजपमधून समसमान वाटपाचा प्रस्ताव समोर आला असून त्यावरच शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच एनडीएचे सरकार काम करणार आहे. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री बनणार आहेत , असे सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपच्या कार्यालयातील अटल सभागृहात भाजपच्या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली.

Comments
Add Comment