Tuesday, November 18, 2025

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार

मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने याचा परिणामी दादर येथील टिळक नगर पुलाचा वापर केला जात आहे. त्यामुळे दादर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवर आता अखेर उपाय शोधण्यात आला असून महापालिका जी उत्तर विभाग कार्यालयासमोरील रस्ता आता थेट सेनापती बापट मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे आता सेनापती बापट मार्गावरून थेट जे. के. सावंत मार्गावर आणि या मार्गावरून सेनापती बापट मार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे शिवाजी मंदिर आणि वीर कोतवाल येथे होणारी वाहतूक कोंडी भविष्यात फुटली जाणार आहे.

दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्गाला जोडून जे. के. सावंत मार्ग जात आहे. हा मार्ग पुढे मनमाला टँक रोड रस्त्याला जोडला जावून पुढे माटुंगा रोड पश्चिम येथील पुलाजवळ जावून मिळतो. या जे. के. सावंत मार्गावर महापालिका जी उत्तर विभागासमोरुन हरिश्चंद्र येलवे मार्ग जात आहे. हा येलवे मार्ग पुढे जावून खंडित होत असून या रस्त्याचा पुढील मार्ग मोकळा केल्यास तो सेनापती बापट मार्गाला जावू मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने निर्णय घेत जमीन संपादित करून येवले माग सेनापती बापट मार्गाला जोडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. हा रस्ता जे. के. सावंत मार्गाच्या ठिकाण ४० फूट रुंदीचा आणि पुढे ५० फूट रुंदीचा तर सेनापती बापट मार्गाला जोडण्याच्या ठिकाण ६.१० मीटर अर्थात २० मीटर रुंदीचा असेल.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर महापालिकेचे जी उत्तर कार्यालय आणि महापालिकेची रहिवासी इमारत आहे, तर अंतिम भूखंडावर आनंदधाम इमारत ए व बी विंग आहे तसेच प्रकाश इमारत अशा तीन इमारती आहेत. भूखंड क्रमांक १९ हा मोकळा असून शाळेसाठी आरक्षित आहे. ही जागा जनरल एज्युकेशन संस्थेच्या मालकीची आहे, याठिकाणी पुर्वी कन्या शाळा होती जी आता बंद असून इमारत जमिनदोस्त करण्यात आली आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता जमिन हस्तांतरीत करून रस्ता रुंदीकरणाची तसेच यातील अडथळा दूर करून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृहासमोरील जे के सावंत मार्गाला जोडणारा हरिश्चंद्र येलवेमार्ग थेट सेनापती बापट मार्गाला जोडला जाणार आहे.

हरिश्चंद्र येलवे मार्ग हा जे. के. सावंत मार्गापासून सेनापती बापट मार्गाला जोडल्यास न . चि. केळकर मार्गावरील कोतवाल उद्यान व टिळक पुलावरील वाहतूक कमी होईल. असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच सावंत मार्गावरील महापालिकेचे असलेले कोहिनूर इमारतीमधील सार्वजनिक वाहनतळास जाणेही सोयीस्कर होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment