कर्तृत्ववान ती राज्ञी : अंजना राठी
वैशाली गायकवाड
‘बॅक टू रूट्स’ म्हणजेच मुळातच निसर्गाने आपल्याला अनंत गोष्टी बहाल केल्या आहेत. पूर्वीप्रमाणेच त्याचे मूळ तत्त्व जाणून घेत त्याचे जतन, संवर्धन करत त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यात केला पाहिजे. आधुनिक औषधोपचार जलद परिणाम देतात; परंतु दीर्घकालीन आरोग्यासाठी जीवनशैलीकडे लक्ष देणे अत्यावश्यक ठरते. अशाच काळात शरीराच्या अंतर्गत शक्तीला जागृत करून संपूर्ण आरोग्य साध्य करण्याची निसर्गोपचार पद्धतीचा जगभरात प्रचार–प्रसार करणाऱ्या ठाण्यातील सिएरा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल्स या ऑटोमेशन कंपनीत जॉइंट डायरेक्टर (शैक्षणिक क्षेत्राने अभियंता) असणाऱ्या ‘अंजना राठी' यांच्या समर्पित जीवन प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
अंजना राठी यांचा जन्म राजस्थानमधील अजमेर येथे एका मध्यमवर्गीय, व्यावसायिक आणि आध्यात्मिक वातावरण असलेल्या कुटुंबात झाला. त्यांच्या घरातील दररोजच्या कीर्तन सत्संगामुळे भक्तिभाव हा आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांमध्ये रुजला. व्यवसाय विस्तारासाठी कुटुंब महाराष्ट्रात स्थायिक झाले आणि त्यांच्या वडिलांच्या टाइल्स फॅक्टरीला महाराष्ट्र सरकारकडून गुणवत्तेचा पुरस्कारही प्राप्त झाला. घरातील मेहनतीचे, सातत्याचे आणि कर्तव्यपरायणतेचे संस्कार अंजना यांच्या स्वभावात दृढपणे रुजले.
सहावीपर्यंत त्यांना मराठी भाषा अवगत नव्हती; परंतु परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर दहावीत त्या मराठीत पहिल्या आल्या. मराठीशी घट्ट नाळ जुळल्याने त्या मराठी साहित्यातील अमृत असणाऱ्या ज्ञानेश्वरीचे वाचन करू शकल्या व अभ्यास करता आल्याचे त्या आवर्जून सांगतात. बारावीनंतर त्यांनी पुण्यातील एस. पी. कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी संपादन केली. शिक्षणासोबतच भाषण, निवेदन आणि व्यवस्थापन कौशल्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
त्यानंतर इन्स्ट्रुमेंटॅशन अभियंता 'संदीप राठी' यांच्याशी विवाह करून त्या ठाण्यात स्थायिक झाल्या. मातृत्वानंतर त्यांना अनेक शारीरिक त्रास जाणवू लागले. विविध उपचार करूनही समाधानकारक आराम न मिळाल्याने शरीराशी संवाद साधणारे पर्यायी मार्ग शोधण्यास त्यांनी सुरुवात केली.
याच काळात त्यांची भेट योगतज्ज्ञ 'अण्णा व्यवहारे' यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योग अभ्यासास सुरुवात केली. योग डिप्लोमा, योग थेरपी तसेच मुंबई विद्यापीठातून योगिक फिलॉसॉफी आणि निसर्गोपचार विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केला. डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डायबेटीस एज्युकेटर कोर्स तसेच मिलेट मॅन ऑफ इंडिया डॉ. खादरवली यांचा मिलेट लाइफस्टाइल कोर्स
मुंबईच्या डॉ. पीयूष सक्सेना यांच्याकडून लिव्हर क्लींझिंग एक्सपर्ट म्हणून प्रशिक्षण घेतले. निसर्गोपचार, मधुमेह जागरूकता, चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार या विषयांवर विविध प्रगत कार्यशाळा त्यांनी संपूर्ण भारतभर तसेच यु एस आणि लंडन येथे आयोजित करून निसर्गोपचाराचे महत्त्व पोहोचविले. कोल्हापूर, मेहसाणा, भीलवाडा यांसह अनेक निसर्गोपचार केंद्रांमध्ये जाऊन त्यांनी सखोल अध्ययन केले. योग, निसर्गोपचार, आपली जीवनशैली या गोष्टींच्या अभ्यासातून प्रत्येक पावलावर त्यांना आरोग्य प्राप्ती झाल्याचा आनंद मिळाला. स्वतःच्या आरोग्यप्राप्तीचा आनंद त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवणे हेच ध्येय मानले. शाळा, कॉलेज, ग्रामसभा, आणि ऑनलाइन माध्यमातून त्यांनी नैसर्गिक रोग निवारण शक्ती (नॅचरल हीलिंग) यावर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. दुबई, लंडन, कॅनडा आणि अमेरिकेपर्यंत त्यांचे उपक्रम पोहोचले.
अत्यंत अभ्यासू आणि संवेदनशील असलेल्या अंजनाताईंनी भारतातील पंचमहाभूते, भगवद्गीता, भक्तियोग, कचरा व्यवस्थापन, फास्ट–फूड विरुद्ध घरचे अन्न अशा सामाजिक विषयांवर नृत्य–नाटिकांचे लेखनही केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ठाणे शहराच्या युथ आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले.
"जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म" या श्लोकानुसार, जेवणाकडे एक साधी क्रिया म्हणून न पाहता, ते एक यज्ञ आहे, जे आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि आत्म्याला शुद्ध करते. अंजनाताई सांगतात की, शरीरात अद्भुत नैसर्गिक हीलिंग पॉवर असते. आपल्या स्वतःच्या शक्तीला ओळखून, तिला योग्य दिशा दिल्यास आरोग्य सहज साध्य होते. त्यामुळे कोणतेही श्रेय त्या स्वतःकडे न घेता संपूर्ण यश “ब्रह्मांडाच्या शक्तीला” अर्पण करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱे अनेक रुग्ण औषधांशिवाय बरे झाले आहेत.
नैसर्गिक उपचार पद्धतीवर दृढ विश्वास आणि ती जीवनशैली सर्वत्र पोहोचवण्याची अखंड इच्छा असल्याने त्यांनी इगतपुरी येथील त्यांच्या केंद्रामध्ये शरीर, मन शुद्धीकरण संकल्पना मांडली आहे. तीन दिवसांच्या बॉडी क्लीन्झिंग कार्यशाळेत शरीराची अंतर्गत–बाह्य स्वच्छता होऊन नवचैतन्याची अनुभूती मिळते. अनेक वर्षे त्यांनी हजारो लोकांना हा अनुभव दिला आहे. बरेचसे आजार हे आपल्या अतिरिक्त खाण्यामुळेच होतात. आपण जे खात आहोत त्याचा १/३ भाग शरीराला मिळतो आणि २/३ आपण डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यात घालवत असतोच. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की, ज्याला कधी, काय, खायचं हे शिकवावं लागतं. आपल्या संपूर्ण स्वस्थ आणि निरोगी जीवनशैलीचे नियोजन करताना अंजना म्हणतात "जीभ और पेट के बीच विवेकरूपी चौकीदार बिठाना चाहिये" म्हणजे आपल्या पोटात काय आणि किती जात आहे याचं भान आपल्याला प्रत्येक क्षणी राहुन आपल शरीर आपल्याशी काय संवाद साधत आहे हे आपल्याला ऐकू येईल. गेल्या काही वर्षांत त्यांनी उपवास किंवा लंघन या नैसर्गिक उपचार पद्धतीचा व्यापक प्रचार केला आहे. उपवासा संबंधित भीती–गैरसमज दूर करून त्यांनी जागरूकता निर्माण केली. २०१६ मध्ये ऑटोफेजीला जागतिक मान्यता मिळाल्याने उपवासाच्या वैज्ञानिकतेचे महत्त्व अधिक वाढले हे त्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
प्रत्येक महिलेला स्वतःचा छंद जोपासण्याचा, स्वतःच्या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करण्याचा सल्ला अंजना देतात. हार्मोनल बदलांना समजून घेत महिलांनी स्वतःतील क्षमता ओळखली, तर मानसिक–शारीरिक आरोग्यात मोठी प्रगती साधता येते, असे त्या ठामपणे सांगतात.
भविष्यात निसर्गोपचाराची जादू देशोदेशी पोहोचावी, अधिक मदतीचे हात या कार्यात जोडले जावेत, हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांना गार्डनिंग, फॅब्रिक पेंटिंग आणि संगीताचीही आवड आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांचे पती संदीप राठी, तसेच भारतातच करिअर निवडलेली त्यांची दोन्ही मुले-अक्षय आणि मुलगी-ओजस्वी यांच्या प्रित्यर्थ व त्यांच्या या संपूर्ण संशोधन प्रवासात वेळोवेळी लाभलेल्या गुरूंप्रति त्या मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.
निसर्ग, श्रद्धा व विज्ञान यांच्या संगमातून आरोग्यप्राप्तीचा संदेश जगभर पोहोचवणाऱ्या अंजनाताईंच्या या पवित्र कार्याच्या पालखीचे भोई आपण सगळ्यांनी होऊया. आपल्याला योगी नाही होता आलं तरी उपयोगी आणि सहयोगी झाले पाहिजे. संपूर्ण ब्रह्मांडात ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तू निरामयाः।।’ असा संदेश निसर्गामार्फतच देणाऱ्या अंजनाताईंचे योगदान हे सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असे आहे.
Vaishu.gaikwad78@gmail.com






