चांदोलीच्या जंगलात तीन वाघ कॅमेऱ्यात कैद झाले तरी त्यांचे वास्तव्य येथे नाही या सत्यावर उपाय शोधत ताडोबा-अंधारीतून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे ‘तारा’ या वाघिणीचे हस्तांतर या आठवड्यात झाले. हा दक्षिण महाराष्ट्राच्या जंगलांना मिळालेला नवजीवनाचा श्वास ठरू शकतो. तो तसाच ठरावा ही महाराष्ट्राच्या वन खात्याकडून अपेक्षा आहे.
गेली अनेक वर्षे वाघांशिवाय पडझड अनुभवत असलेल्या चांदोली-कोयना पट्ट्याला या एका ऑपरेशनने नवी दिशा दिली आहे. पश्चिम घाटाच्या या दगडी कड्याकपारीत वाघ या शिखर-भक्षकाचा अभाव हा केवळ पर्यावरणीय मुद्दा नव्हता, तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेचा तोलच ढासळलेला होता. जंगलाची पुनरुत्पादन क्षमता कमी झाली होती. ‘तारा’चे आगमन हा या तुटलेल्या साखळीला पुन्हा एकत्र जोडण्याचा टप्पा आहे. वाघ असल्यावर जंगलातील प्रत्येक प्रजातीला नैसर्गिकरीत्या आपली मर्यादा कळते. त्या त्या प्राण्यांचा वेग, हालचाल आणि जीवनशैली सुधारते आणि त्यामुळे हळूहळू जंगलाची आरोग्यवस्था जोर पकडते. सह्याद्रीचा हा फायदा थेट सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांपर्यंत पोहोचू लागेल. वाघ म्हणजे पर्यटनाचा आत्मा. दशकभरापासून चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या नावाला वैभव होते, पण वास्तवाचा त्याला आधार नव्हता. पर्यटकांना सफारीची भावना असूनही वाघ दिसत नसल्याने चांदोली आणि कोयना पट्टा पर्यटकांच्या यादीत मागे पडत होता. तारा आल्यावर पर्यटकांचा कल पुन्हा जंगलाकडे वळेल, याचा थेट फायदा स्थानिक होमस्टे, हस्तकला, ग्रामीण पर्यटन मार्गदर्शक आणि खाद्यपदार्थ उत्पादकांना होईल. सह्याद्रीत येणारा प्रत्येक पर्यटक हा स्थानिक अर्थव्यवस्थेच्या चक्राला हातभार लावणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे तेथील गावकऱ्यांना रोजगाराच्या नव्या शक्यता निर्माण होतात. पर्यावरण शिक्षण, ईको-ट्रेल्स, बर्डिंग गाइड्स, स्थानिक स्वयंसहाय्यता गट यांना यामुळे नवे दार उघडते; परंतु ‘तारा’ची गोष्ट फक्त पर्यटनाभोवती फिरत नाही.
सह्याद्रीत कोयना, वारणा, कृष्णा खोऱ्यांतील जलस्रोत हे या हिरव्यागार कड्यांच्या आरोग्यावर अवलंबून आहेत. जंगल दाट असेल तर पावसाचे पाणी हळूहळू जमिनीत मुरते आणि पुढे नद्यांना नियमित प्रवाह देत राहते. पण गेल्या काही वर्षांत जंगल नष्ट होत गेल्याने पाण्याची अनियमितता वाढली. सांगली, कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पूरस्थिती तीव्र होत गेली. वाघ आल्यावर जंगलातील अतिक्रमण आणि बेकायदेशीर चराईवर प्रशासनाची नजर वाढते. वाघ असलेल्या क्षेत्रात लोक जाणीवपूर्वक सावध राहतात जंगलावर अधिक नियंत्रण ठेवले जाते. यामुळे जलस्रोतांचे दीर्घकालीन संरक्षण होते आणि नैसर्गिक नियंत्रण मिळते. हवामान बदलामुळे पावसाची स्वरूपे अधिक आक्रामक होत असताना अशा स्थिर जंगलाची गरज अधिकच वाढली आहे. या प्रकल्पाचा विस्तारित परिणाम कोकण आणि उत्तर कर्नाटकापर्यंतही जाणवेल. सह्याद्री, अंबोली, दांडेली हा नैसर्गिक प्राणी कॉरिडॉर इतिहासात जिवंत होता; पण शहरीकरण, रस्ते, खाणी, विद्युत प्रकल्प यांनी त्याच तुकडे-तुकडे केले. ‘तारा’सारखे वाघ स्थलांतरित झाल्यावर या कॉरिडॉरकडे पुन्हा एकदा शास्त्रीय दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण होते. वाघांची ये-जा होत असेल तर हत्ती, गवा, अस्वल, वनकुत्रा यांच्या हालचालीही सुव्यवस्थित राहतात. जैवविविधता फक्त वाघावर अवलंबून नसली तरी वाघ हा त्या विविधतेचा मुख्य सूचक असतो. कोकणातील जंगलांवर खाणकाम किंवा अनियोजित रस्त्यांचे दडपण वाढले की अशा वाघ प्रकल्पांमुळे पर्यावरणीय अनुमतीच्या निकषांत काटेकोरपणा येतो. मात्र या प्रकल्पात धोकेही कमी नाहीत. वाघाला हवा असलेला अखंड जंगल पट्टा आज अनेक भागांत तुटलेला आहे. चांदोली, कोयना, राधानगरीला जोडणारा पट्टा अजूनही अनेक ठिकाणी अरुंद किंवा व्यत्यय आणणारा आहे. गावांची वाढ, व्यावसायिक शेती, जंगल रस्ते या सगळ्यामुळे वाघाला फिरण्यासाठी हवी असलेली शांतता कमी होते.
मानवी-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढते. जनावरांवर हल्ले झाले तर स्थानिक लोकांचा विरोध उफाळू शकतो. म्हणूनच जलद आणि सन्मान्य पद्धतीने भरपाई देणारी यंत्रणा, सतत जनजागृती आणि गावकऱ्यांचा थेट सहभाग हे तीन स्तंभ अनिवार्य आहेत, तर दुसरीकडे, सह्याद्रीत शिकार प्राणी पुरेसे नसल्यास वाघ टिकू शकणार नाही. ताडोबात विपुल असलेले सांबर-गवा सह्याद्रीत कमी प्रमाणात दिसतात, त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या वाढीकडे लक्ष द्यावे लागेल. या सगळ्यांवर शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. प्रशासनातील सातत्य नसले तर अशा प्रकल्पाचे भवितव्य धोरण बदलांमध्ये अडकते. तरीही एक गोष्ट निर्विवाद आहे, वाघाचे आगमन म्हणजे निसर्गाचा आत्मविश्वास परत येणे. वाघ असताना जंगलातील वृक्षांचे पुनरुज्जीवन अधिक वेगाने होते, कारण शाकाहारी प्राण्यांचा ताण कमी होतो. दाट जंगलाने कार्बन शोषण वाढते आणि हवामान बदलाचे दडपण कमी करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. झरे आणि ओहोळ पुन्हा जिवंत होतात. पक्षी, साप, कासव, कीटक, औषधी वनस्पती यांची संख्या वाढते. हे सर्व मिळून एक मजबूत परिसंस्था तयार करते आणि ही परिसंस्था हवामान बदलाच्या संकटात माणसाला आधार देणारी सर्वात शक्तिशाली ढाल आहे. ऑपरेशन ‘तारा’ हे म्हणून केवळ एका वाघिणीचे स्थानांतरण नसून संपूर्ण सह्याद्रीचा पुनर्जन्म आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या पर्यावरणीय आणि आर्थिक भविष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रकल्पाला मिळणारा लोकसहभाग, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि राजकीय बांधिलकी. वाघाचे पाऊल सातारा, सांगली, कोल्हापूरच्या मातीत पुन्हा उमटले तर तो निसर्गाचा विजय असेल आणि हवामान बदलाच्या अंधाऱ्या भावी दिवसांना तोंड देण्यासाठी या प्रदेशाला वाघाच्या रूपाने मिळालेला सर्वात मोठा मित्र असेल. फक्त तो मित्र जंगलातच राहिला पाहिजे माणसांच्या घरापर्यंत त्याला येऊ न देणे ही जबाबदारी वन विभागाची!






