नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत पास झाली. आता एनडीएने दिल्ली आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तर विरोधक 'स्थानिक'च्या निवडणुकांमध्ये एनडीएला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीआधीची ही एक मोठी लढाई आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत आम आदमी पक्षाच्या दारुण पराभवानंतर, ३० नोव्हेंबर रोजी १२ एमसीडी वॉर्डमध्ये पोटनिवडणुका होत आहे. यात आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष ताकद आजमावून बघतील. काँग्रेस पण या निवडणुकीत नशीब आजमावणार आहे.
महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील.
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक
नगरपालिका : २४६
नगरपंचायती : ४२
एकूण जागा : ६,८५९
अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबर
अर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंत
मतदान : २ डिसेंबर
मतमोजणी : ३ डिसेंबर
विभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायती
कोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती : ४५, नागपूर : ५५
देशात पुढील पाच वर्षात आसाम, केरळ, तामीळनाडू, पश्चिम बंगाल या चार राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभेची निवडणूक होणार आहे. विधानसभेच्या आसाममध्ये १२६, तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, पश्चिम बंगालमध्ये २९४ आणि पुद्दुचेरीत ३० जागा आहेत. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत.






