मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ आणि इतर रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर घर करणाऱ्या अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोरेगाव याठिकाणी कोलते पाटील व्हर्व्ह या बिल्डिंगमधील त्याच्या निवासस्थानात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुदैवाने, घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या तत्पर प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी केलेली मेहनत दिसून येत आहे.
शिव ठाकरेच्या टीमने या प्रकरणी अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे की, “आज सकाळी मुंबईतील कोलते पाटील व्हेर्व्ह इमारतीतील शिव ठाकरे यांच्या घराला आग लागली. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही, परंतु घरातील काही सामग्री मोठ्या प्रमाणात जळून नष्ट झाल्या आहेत. अभिनेत्याचे कुटुंब सुरक्षित आहे.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अद्याप शिवने स्वतः सोशल मीडियाद्वारे या घटनेबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मूळ अमरावतीचा असलेला शिव ठाकरे ‘एमटीव्ही रोडीज रायजिंग’, ‘बिग बॉस मराठी २’, ‘बिग बॉस १६’, ‘झलक दिखला जा ११’, ‘खतरों के खिलाड़ी १३’ या रिऍलीटी शोमधून लोकप्रिय झाला. मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात त्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलिकडे त्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले होते, ज्याची माहिती त्याने ‘झलक दिखला जा’ शो दरम्यान चाहत्यांसोबत शेअर केली होती.






