पुणे : पुण्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे जंक्शनवरील वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आता दोन प्रमुख गाड्यांच्या सुटण्याचे आणि पोहचण्याचे टर्मिनल पुण्याहून थेट हडपसर स्थानकात हलवण्यात आले आहे. यामुळे पुणे स्टेशनचा ताण कमी होणार असून हडपसर परिसरातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रेल्वेच्या निर्णयानुसार पुणे–नांदेड–पुणे एक्स्प्रेस आणि पुणे–हरंगुळ–पुणे एक्स्प्रेस या गाड्या २६ जानेवारीपासून हडपसर येथूनच सुटतील आणि तिथेच परत येतील.
हडपसरचे नवे टर्मिनल आधुनिक सोयींसह सज्ज
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत उभे केलेले हडपसरचे हे नवे टर्मिनल पुण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सुमारे १३५ कोटींच्या खर्चातून करण्यात आलेल्या या प्रकल्पात खालील सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
६०० मीटर लांबीचे अप व डाउन प्लॅटफॉर्म, ज्यावर २४ डब्यांच्या गाड्यांचे थांबे शक्य
जुन्या मालवाहतूक मार्गांचे रूपांतर आणि नवीन मालवाहतूक कॉरिडॉर
आधुनिक स्टेशन इमारत आणि विस्तारित सर्क्युलेटिंग एरिया
वाढीव पार्किंग सुविधा
प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ चे काम पूर्ण
लवकरच उपलब्ध होणाऱ्या सुविधा: लिफ्ट, एस्केलेटर, १२ मीटर रुंद फुटओव्हर ब्रिज, रूफ प्लाझा आणि निवासगृह
हडपसर टर्मिनल कार्यान्वित झाल्याने पूर्व पुण्यातील प्रवाशांना प्रवासासाठी अधिक सोयी मिळतील आणि पुणे जंक्शनवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गाड्यांचे सुधारित वेळापत्रक
हडपसर–हजूर साहेब नांदेड–हडपसर एक्सप्रेस (दैनिक)
गाडी क्रमांक 17629 हडपसर–हजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून दररोज रात्री ९:५० वाजता हडपसरहून सुटणार
गाडी क्रमांक 17630 हजूर साहेब नांदेड–हडपसर एक्स्प्रेस दररोज पहाटे ४:३५ वाजता हडपसर येथे आगमन
हडपसर–हरंगुळ–हडपसर एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 01487 हडपसर–हरंगुळ एक्स्प्रेस सकाळी ६:२० वाजता हडपसरहून सुटणार
गाडी क्रमांक 01488 हरंगुळ–हडपसर एक्स्प्रेस रात्री ८:४५ वाजता हडपसरला पोहचणार






