उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी
महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण छोटी-मोठी राजकीय ऑपरेशन अगदी सहज करून टाकतो. महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं मोठं ऑपरेशन मी काही वर्षांपूर्वी यशस्वी केलं!”,अशा भन्नाट वाक्याने सभागृहात हशा आणि टाळ्यांचा वर्षाव झाला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील हॉटेल ड्रीमलँड मध्ये महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स आयोजित संमेलन २०२५ पार पडले. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, जीवनगौरव पुरस्कार विजेते प्राप्त हृदय रोग तज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ, डॉक्टर विजयालक्ष्मी बाळेकुंद्रे, डॉक्टर अलका देशपांडे, डॉक्टर सुभाष वाघ, डॉक्टर प्रदीप सिंघल, अंजली राज्याध्यक्ष, डॉक्टर उमेश पिंगळे, डॉक्टर गिरीश राज्याध्यक्ष, डॉक्टर नारायण देवगावकर, बी.के. महावारकर, सुरेश शिंदे, जे. डी. पोळ, युवराज पवार, सुरेश चव्हाण, डॉक्टर, प्रसाद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. हिरेमठ यांच्या ८ हजार हृदयांवर केलेल्या यशस्वी उपचारांचा गौरव करताना शिंदे म्हणाले. “तुम्ही हृदय बरे करता… आणि आम्ही कधी कधी लोकांच्या हृदयाचे ठोके चुकवतोही! पण महाराष्ट्राच्या हितासाठी जे लागेल तेच करतो.”
कोविड काळातील भीषण आठवणी सांगताना शिंदे भावुक झाले. ते म्हणाले, मी स्वतः पीपीई किट घालून रुग्णांना भेटत होतो, रात्री १२ वाजता ऑक्सिजन संपत असल्याचे फोन यायचे, राज्यभर लहान-मोठे ऑक्सिजन प्लांट उभारले, डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं.
विकास, राजकारण आणि हटके विनोद भाषणात शिंदेंची खास शैली रंगली. विकास प्रकल्पांवरही त्यांनी भर दिला. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, पुणे–नाशिक–नागपूर विकास, कल्याणकारी योजनांचा पाढा त्यांनी वाचला.






