Sunday, November 16, 2025

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी

पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या पाच वर्षांत या परिसरात २५७ अपघात नोंदवले गेले असून, त्यापैकी ९५ अपघात गंभीर स्वरूपाचे होते. मागील पाच वर्षांत नवले पूल परिसरात ११५ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडून समोर आली आहे. याच काळात ९४ नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे नवले पूल परिसर मृत्यूचा सापळाच झाला असल्याचे गुरुवारी झालेल्या अपघातामुळे अधिकच अधोरेखित झाले आहे.

नवले पूल हा पुणे-बंगळूरु महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असून, सततची वर्दळ, वाहतूक कोंडी, एकमेकांना ओलांडून जाण्याची स्पर्धा आणि वेगाची हौस या परिसराला अपघातप्रवण क्षेत्र बनवत आहे. सर्वाधिक अपघात होणारे ब्लॅकस्पॉट म्हणून नवले पूल प्रसिद्ध आहे. या नवले पुलावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊनच नागरिक प्रवास करतात, कारण कधी काय होईल अन् अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही.

२०२१ मध्ये २१ अपघात झाले आणि २८ जणांचा मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये अपघातांची संख्या वाढून २५ झाली आणि मृत्यू २७ झाले. शहरात पाच वर्षांत म्हणजे २६० आठवड्यात ११५ जणांचा मृत्यू झाला म्हणजे दोन ते तीन दिवसांनंतर नवले पूल परिसरात एकाचा अपघातील मृत्यू होत असल्याचे भयावह वास्तव आहे.

२०२३ मध्ये सर्वाधिक मृत्यू

२०२३ वर्षात २२ अपघातांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वांत जास्त मृत्यू संख्या असलेले वर्ष ठरले. २०२४ मध्ये १८ अपघातांत २० जणांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ९ अपघात झाले असून, त्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवले पूल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

या सर्व घटनांमुळे नवले रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना व वाहतूक तज्ज्ञांनी वारंवार केलेल्या सूचना असे असूनही येथे सुधारणा मंद गतीने होत असल्याची टीका केली जात आहे. पुलाजवळील उतार, अनियमित पार्किंग, चुकीच्या ओव्हरटेकिंग वेळी कमी दृश्यता आणि वेगमर्यादांचे पालन न होणे ही प्रमुख कारणे म्हणून सांगितले जात आहेत. वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार येथे सातत्याने गस्त वाढविण्यात आली आहे; परंतु नागरिकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुलाखाली व आसपासच्या भागात सिग्नल प्रणाली सुधारण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याची, वेगमर्यादा दर्शक फलक अद्ययावत करण्याची आणि रस्त्याच्या डिझाइनमध्ये आवश्यक बदल करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा