Sunday, November 16, 2025

बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जंगलराज उखडून टाकू!

बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जंगलराज उखडून टाकू!

पंतप्रधान मोदींचे विजयसभेत ‘बंगाल’साठी एल्गार

नवी दिल्ली  : काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टिकोन नाही. आज काँग्रेस पक्ष मुस्लीम लिगी माओवादी काँग्रेस बनला आहे, असा घणाघाती हल्ला चढविताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याचे भाकीत वर्तविले. तसेच, बिहारचा निकाल हा वंशवादी राजकारणाच्या विरोधातील विकासवादी जनादेश असून राष्ट्रीय जनता दलाचा तुष्टीकरणाचा ‘एम-वाय’ (मुस्लिम-यादव) फॉर्म्युला उद्ध्वस्त झाला आहे. आजच्या विजयाने सकारात्मक ‘एम-वाय’ (महिला आणि युवक) फॉर्म्युला पुढे आला आहे, अशी तोफ पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर डागली.

बिहारच्या विजयाने पाच राज्यांच्या विधानसभा निडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. बिहारमधूनच गंगा बंगालमध्ये जाते. बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जंगलराज भाजप उखडून टाकेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील विजयानंतर पश्चिम बंगालमधील लढाईचे रणशिंग फुंकले. बिहारमधील अभूतपूर्व विजयानंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मोदींनी ४१ मिनिटांच्या भाषणात लोकनायक जयप्रकाश नारायण, भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना अभिवादन करताना आजचा विजय बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प दर्शविणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शानदार नेतृत्वाची प्रशंसा केली. तसेच दिलीप जयस्वाल, सम्राट चौधरी, जीतनराम मांझी, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाहा या नेत्यांच्या योगदानाचाही आवर्जून उल्लेख केला.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, वीर सावरकरांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने ‘एनडीए’ला विजयी केले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीनेही ‘एनडीए’ला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. काँग्रेसवरील जनतेचा विश्वास सातत्याने घटतो आहे, अशी बोचरी टीका करताना मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्ष बिहारमध्ये ३५ वर्षांपासून, गुजरातमध्ये ३० वर्षांपासून, उत्तरप्रदेशात व पश्चिम बंगालमध्येही तीन ते चार दशकांपासून सत्तेत नाही.

केवळ नकारात्मकता हाच काँग्रेसच्या राजकारणाचा आधार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा राज्यांत विधानसभेसाठी निवडणूक झाली. त्यातही काँग्रेसला १०० जागा मिळवता आलेल्या नाहीत. आजच्या एकाच दिवसात भाजपचे जेवढे आमदार निवडून आले तेवढे काँग्रेसला मागील सहा निवडणुकांमध्ये निवडून आणता आलेले नाहीत.’’राहुल गांधींचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी खरमरीत शब्दात काँग्रेस पक्षाला फटकारले. ते म्हणाले, केवळ नकारात्मकता हाच काँग्रेसच्या राजकारणाचा आधार उरला आहे. चौकीदार चोर है अशी घोषणा देणे, संसदेचा वेळ वाया घालवणे, सर्व संस्थांवर प्रश्न उपस्थित करणे, मतचोरीचा आरोप करणे, देशाच्या शत्रूंचा अजेंडा पुढे आणणे यापलीकडे काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टिकोन नाही. तसेच काँग्रेसचे नामदार पक्षाला ज्या रस्त्यावर नेऊ पाहत आहेत त्याविरुद्ध नाराजी काँग्रेस पक्षात वाढत असून काँग्रेसमध्ये फूट पडू शकते.

Comments
Add Comment