Saturday, November 15, 2025

महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती

महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती

राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद आणि १५ जागा

महाड : ऐतिहासिक महाड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आज महाडमध्ये पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, भाजपचे नेते बिपीन म्हामुणकर, सुभाष निकम, तालुका अध्यक्ष निलेश महाडीक, निलेश तळवटकर, ॲड. भाटे आदी उपस्थित होते. यावेळी अनिकेत तटकरे यांनी महाड शहराच्या सर्वांगिण विकासाकरीता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप संयुक्तरीत्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र निवडणूक लढवित आहे. मात्र ऐतिहासिक महाड शहरातून या युतीची सर्वप्रथम घोषणा करीत असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने संयुक्तरीत्या विचार करून महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद व १४ ते १५ जागा आणि भाजपला ५ ते ६ जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर सेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा खा. सुनील तटकरे हे उद्या शुक्रवारी महाड दौऱ्यावर असताना करतील असे तटकरे यांनी सांगितले.

महाडची जनता सुज्ञ आणि सुसंस्कृत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल असे सांगत महाडची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युती जिंकण्याच्या उद्देशाने लढवतील आणि महाडच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निधी आणला जाईल असे सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ही युती कायम राहील असे संकेत यावेळी तटकरे यांनी दिले. यावेळी बिपीन म्हामुणकर यांनी महाड नगर परिषद निवडणुकीसाठी मित्र पक्षांनी सन्मानपूर्व जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्याचे निवडणूक समन्वयक सतिश धारप, आ. प्रवीण दरेकर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सन्मानपूर्वक जागा सोडल्याने त्यांच्या सोबत युतीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युती महाडच्या जनतेला पारदर्शक कारभार व जनतेला न्याय देण्याचे काम करेल असे म्हामुणकर यांनी सांगितले. माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत वचननाम्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली असून २० टक्के कामे ही कोरोनाच्या काळात २ वर्ष वाया गेल्याने शिल्लक राहील. ही कामे आमच्या या वेळच्या वचननाम्यात समाविष्ट असतील असे सांगत महाड नगर परिषदेच्या प्रशासकीय काळात आलेल्या विकासकांमाच्या निधीबाबत आपण निवडणूक प्रचार काळात भाष्य करू असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment