दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे महत्त्व देखील आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात. कारण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंच्या शरीरातून देवीचा जन्म झाला होता. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी १५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजून ३७ मिनिटांनी संपेल. उत्पन्न एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचे शुद्धीकरण होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्याच बरोबर या दिवशी तुळशीशी संबंधित नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे.
एकादशीला तुळशीबद्दल पाळा हे नियम
हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार असे म्हटले जाते की तुळशीमाता एकादशीला भगवान विष्णूसाठी निर्जल व्रत करते. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. जर तुम्ही या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्यास तुळशी मातेचा उपवास मोडतो. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. खराब किंवा अस्वच्छ हातांनी तुळशीला स्पर्श करू नका. या चुका केल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.
उत्पन्ना एकादशी मागील पौराणिक कथा
सत्ययुगात नदीजंग नावाचा एक राक्षस होता, त्याच्या मुलाचे नाव मुर होते. पराक्रमी आणि बलवान राक्षस मुरने इंद्र, वरुण, यम, अग्नि, वायू, ईश, चंद्रमा, नैरुत इत्यादी स्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता. यावेळी सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते. भगवान विष्णूंनी यावेळी युद्धभूमीचा स्वीकार करत मुर राक्षसासोबत लढत दिली. असे म्हणतात की, मुर आणि विष्णू यांच्यामधील हे युद्ध १० हजार वर्षे चालू होते. भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गुहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षस मुरही विष्णूचा पाठलाग करत तिथे पोहोचला. यावेळी भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली. या देवीने मुर राक्षसाचा वध केला. दैत्याचा नायनाट झाल्यामुळे भगवान विष्णूंनी देवीला वर दिला. देवीचा जन्म एकादशी तिथीला झाल्यामुळे उत्पन्ना एकादशी असे नाव ठेवण्यात आले.






