Saturday, November 15, 2025

प्रयोग क्रमांक १३३३३... आणि प्रशांत दामले...!

प्रयोग क्रमांक १३३३३...  आणि  प्रशांत दामले...!

राजरंग : राज चिंचणकर

(अरे, हाय काय आणि नाय काय...) मराठी रंगभूमीवरचे ‘विक्रमादित्य’ म्हणून सार्थ ओळख असलेले रंगकर्मी प्रशांत दामले यांनी आता अजून एक विक्रम करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. रंगभूमीवर गेल्या तब्बल ४३ वर्षांत ३५ नाटकांतून भूमिका साकारत त्यांनी आतापर्यंत विविध विक्रमांना गवसणी घातली आहे. मात्र आता ते त्यांच्या एका वैयक्तिक विक्रमाकडे वळले आहेत आणि हा विक्रम होऊ घातला आहे, तो त्यांच्या वैयक्तिक १३३३३ व्या प्रयोगाचा आणि तो सुद्धा चक्क त्यांच्या वयाच्या ६४ व्या वर्षी...! 'अरे, हाय काय आणि नाय काय' या त्यांच्याच शब्दांत या घटनेचे वर्णन करावे लागेल. १६ नोव्हेंबर रोजी ते या प्रयोगाच्या संख्येचा टप्पा ओलांडणार असून, पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर प्रशांत दामले यांच्या या विक्रमाचे साक्षीदार होणार आहे.

प्रशांत दामले यांच्या १३३३३ व्या प्रयोगाच्या आणि वैयक्तिक विक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, "माझ्यासाठी १३३३३ वा प्रयोग हा एक महत्त्वाचा टप्पा असा आहे की ज्यामुळे मला काम करायला अजून उत्साह येतो आणि अजून काम करण्याची ऊर्जा निर्माण होते". प्रशांत दामले यांना 'टायमिंगचा बादशहा' यासह 'परफेक्ट प्लॅनर' म्हणूनही समस्त नाट्यसृष्टी ओळखते आणि त्याबद्दल त्यांना विचारले असता ते सांगतात, "टाईम प्लॅनिंग हे अतिशय महत्त्वाचे असते आणि त्याच्या जोडीने आपल्याला नक्की काय करायचे आहे, याचेही गणित बांधलेले असणे गरजेचे आहे". आता १६ नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले यांचा हा विक्रम नोंदला जाईलच; परंतु हे साध्य करत असताना त्यांच्यातला कलाकार आणि निर्माता रंगभूमीवरच्या सर्व घटकांचा कसा विचार करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते. जेव्हा प्रशांत दामले यांनी त्यांच्या या विक्रमाचे सूतोवाच सोशल मिडीयावरून केले; त्यावेळी त्यांना कायम साथ देणाऱ्या बॅकस्टेज कलाकारांना ते अजिबात विसरले नाहीत. सोशल मिडियाच्या माध्यमातूनच त्यांनी एक-एक करून बॅकस्टेज कलाकाराची स्वतःहून ओळख करून देत त्यांच्या योगदानाला सलाम केला आहे. या कलाकारांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात, "बॅकस्टेज आर्टिस्ट हा आमच्या व्यवसायातला अविभाज्य घटक आहे. माझ्यासोबत तर तीस-पस्तीस वर्षे काम करणारेही काही बॅकस्टेज कलाकार आहेत. त्यांच्याशिवाय नाटक पूर्ण होऊच शकत नाही". पुढच्या काळात अजून काही नवीन करायचे योजले आहे का, असे त्यांना विचारल्यावर पक्का व्यावसायिक बाणा बाळगत आणि हातातले पत्ते उघड न करता ते सांगतात, "विशेष काहीतरी करायचे डोक्यात आहे, पण त्याबद्दल आत्ता काही सांगणार नाही. त्या-त्या वेळी ते-ते नक्कीच सर्वांसमोर येईल".

'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर आतापर्यंत विविध विक्रम नोंदले गेले आहेत. २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी केलेले तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग; त्याचवर्षी ३६५ दिवसांत केलेले एकूण ४५२ प्रयोग; १९९६ या वर्षी ३६५ दिवसांत केलेले एकूण ४६९ प्रयोग; १८ जानेवारी २००१ रोजी एकाच दिवशी केलेले 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचे दोन, 'एका लग्नाची गोष्ट' नाटकाचा एक आणि 'चार दिवस प्रेमाचे' दोन; असे पाच प्रयोग आदी दमदार कामगिरी त्यांच्या नावावर आहे. प्रशांत दामले हे केवळ नटच नाहीत; तर गायक-नट म्हणूनही त्यांनी मोहोर उमटवली आहे. 'मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं' या त्यांच्या कंठातून प्रसवलेल्या गाण्यावर लाखो रसिक फिदा आहेत आणि अनेकांच्या मनाला सुख मिळवून देण्याचे काम त्यांच्या या गाण्याने करून ठेवले आहे. आता १६ नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले करत असलेल्या वैयक्तिक १३३३३ व्या प्रयोगाचा मान 'शिकायला गेलो एक' या सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या त्यांच्या नाटकाला मिळाला आहे. साहजिकच, तमाम रसिकजनांसह या नाटकात भूमिका करणारे कलाकार त्या दिवशी प्रशांत दामले यांच्या या विक्रमी प्रयोगाचे प्रत्यक्ष साक्षीदार होणार आहेत. या नाटकात प्रशांत दामले यांच्यासोबत भूमिका साकारणारे अभिनेते सुशील इनामदार हे याविषयीच्या भावना व्यक्त करताना आणि प्रशांत दामले... ‘बस नाम ही काफी हैं...!’ असे सार्थ अभिमानाने म्हणतात. या विक्रमाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभणार आहे आणि त्यादृष्टीने व्यक्त होताना ते सांगतात, सातत्याने फक्त आणि फक्त नाटक करता येते व त्यावर स्वतःचे घर तसेच नाटक कंपनीतली माणसे यांना सांभाळले जाऊ शकते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत दामले. आज जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय, तेव्हा लक्षात येते की हे एक अद्भुत रसायन आहे. काम सुरू असताना अत्यंत माफक बोलणे; पण ते जेव्हा रंगमंचावर जातात तेव्हा काही तरी घडते. अत्यंत तेजस्वी चेहरा, बोलके डोळे आणि आपलासा करून टाकणारा तो स्वर्गीय आवाज. रंगमंच हेच आपले घर आहे, अशा पद्धतीने ते रंगभूमीवर वावरतात. विनोदी नाटकात बोलण्याचे मीटर आणि श्वास किती महत्त्वाचा आहे, हे नव्याने त्यांच्यामुळे कळले. स्वस्थ बसणे हे त्यांच्या गावीच नाही. नाटक हे आपले कुटुंब आहे आणि त्यात काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज कलाकार, सेटिंगवाले हे आपल्या घरचे सदस्य आहेत, याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. १३३३३ प्रयोगांचा पल्ला गाठणे, हे काही खायचे काम नाही. थक्क व्हायला होते त्यांना बघून. वयाच्या ६४ व्या वर्षी ज्या ऊर्जेने ते काम करतात, ते बघून आम्हालाच दमायला होते. नाटक ही त्यांची भूक आहे आणि प्रेक्षक हे त्यांचे जेवणाचे ताट आहे. १६ तारखेला होणाऱ्या त्यांच्या १३३३३ व्या प्रयोगाचे आम्ही साक्षीदार असणार आहोत, याचा आनंद खूप मोठा आहे".

Comments
Add Comment