Saturday, November 15, 2025

‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये दीप्ती भागवतचा रहस्यमय प्रवास!

‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये दीप्ती भागवतचा रहस्यमय प्रवास!

“हिचकॉक म्हणजे थ्रिलचा राजा! त्यांच्या कलाकृतींमध्ये असलेला गूढपणा, रोमांच आणि भीतीचा सूक्ष्म खेळ नेहमीच मला मोहवतो,” असं अभिनेत्री दीप्ती भागवत सांगते. लवकरच रंगभूमीवर ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकातून मीरा ही मध्यवर्ती भूमिका ती साकारणार आहे. ही भूमिका प्रेक्षकांना रहस्याच्या नव्या जगात घेऊन जाणार आहे.

हे नाटक सुप्रसिद्ध चित्रपटकार सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या क्लासिक कथानकावर आधारित असून लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्याला मराठी रंगभूमीचा साज चढवला आहे. “मूळ कथेचा आत्मा कायम ठेवून, मराठी संवेदनांचं साजेसं रूपांतर करणं ही मोठी कसोटी होती आणि आमच्या टीमने ती उत्कृष्टरीत्या पार पाडली,” असं दीप्ती म्हणते. दीप्तीची ‘मीरा’ ही एक बहुरंगी व्यक्तिरेखा आहे. श्रीमंती, सौंदर्य आणि आत्मविश्वासाने झगमगणारी, पण अंतर्मनात असंख्य प्रश्न आणि भावनांच्या वादळांनी ढवळलेली. “ती दोषी आहे की बळी, हे समजून घेणंही नाटकाचा भाग आहे,” असं दीप्ती सांगते. या भूमिकेसाठी भावनिक खोली आणि संयम दोन्हीची गरज भासली. प्रत्येक दृश्य हे प्रेक्षकांशी संवाद साधणारं आहे. काही संवाद शब्दात नाहीत, ते नजरेत आहेत. नाटकातील प्रत्येक थांबा, प्रत्येक शांतता काहीतरी सांगून जाते. असं ती सांगते.

दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबतचा अनुभव म्हणजे “शिकण्याचा प्रवास” असं ती म्हणते. प्रत्येक तालमीत विजय सरांनी पात्राची नवी बाजू दाखवली. त्यामुळे ‘मीरा’ला खऱ्या अर्थाने मी आतून जगू शकले. बदाम राजा प्रोडक्शनसह, अनिकेत विश्वासराव, श्वेता पेंडसे, राहुल पेठे, सुबोध पंडे आणि पुष्कर श्रोत्री या सहकलाकारांसोबत काम करणं ‘सहज आणि प्रेरणादायी’ असल्याचं ती सांगते.

अ परफेक्ट मर्डर हे फक्त रहस्यमय नाटक नाही, तर तो एक भावनांचा आणि सस्पेन्सचा सजीव खेळ आहे. तो रंगमंचावर अनुभवताना प्रेक्षक श्वास रोखून बसतील, असा विश्वास दीप्ती व्यक्त करते. थ्रिल, नात्यांचा गुंता आणि अभिनयाचा उत्कट संगम असलेले “अ परफेक्ट मर्डर” हे नाटक मराठी रंगभूमीवर एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

Comments
Add Comment