Friday, November 14, 2025

Bihar Election Result 2025 : 'टांगा पलटी, घोडं फरार!' प्रशांत किशोर यांचा पहिल्याच निवडणुकीत सपशेल पराभव; आता राजकारण सोडून 'कलटी' मारणार?

Bihar Election Result 2025 : 'टांगा पलटी, घोडं फरार!' प्रशांत किशोर यांचा पहिल्याच निवडणुकीत सपशेल पराभव; आता राजकारण सोडून 'कलटी' मारणार?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे राजकीय प्रयोग जन सुराज पार्टीसाठी (Jan Suraj Party) पहिल्या क्षणीच कठीण परिस्थितीत आला आहे. या निवडणुकीत जन सुराजला एकही जागा मिळालेली नाही, ज्यामुळे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या राजकीय प्रवासाला मोठा झटका बसला आहे. निवडणुकांपूर्वीच्या तीन वर्षांच्या कष्टसाध्य प्रवास, राज्यभरातील हजारो किलोमीटरची पदयात्रा, डिजिटल माध्यमांवरील लोकप्रियता, आणि ‘बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय’ उभा करण्याचा दावा या सर्व गोंगाटानंतरही निकाल प्रशांत किशोर यांची अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. यामुळे आता प्रशांत किशोर यांनी नितीशकुमारांना २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्यास राजकारण सोडण्याचे आव्हान दिले होते. निकालानंतर आता प्रश्न उपस्थित झाला आहे की, प्रशांत किशोर यांचा पुढील राजकीय मार्ग काय असेल. तरीही, या निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या पराभवानंतरही एक बाब लक्षात येते की, जन सुराजने एनडीएच्या पथ्यावर काही प्रमाणात दबाव निर्माण केला, तसेच महाआघाडीला या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे.

प्रशांत किशोर : गावातून UN पर्यंतचा प्रवास आणि राजकीय रणनीतीची सुरुवात

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. कोनार या साध्या गावात जन्मलेले प्रशांत किशोर, बक्सरमध्ये शिक्षण घेतल्यावर अचानकच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात झेपावले. २०११ पर्यंत आरोग्य क्षेत्रातील नियोजन, सर्वेक्षण, आणि सामुदायिक सहभागातील कौशल्य यामध्ये त्यांचा अनुभव, नंतरच्या त्यांच्या राजकीय रणनीतीत स्पष्टपणे दिसून आला. विशेष म्हणजे, २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला दिलेला पाठिंबा हा त्यांच्या राजकीय रणनीतीचा पहिला ठळक टप्पा होता. यानंतर प्रशांत किशोर यांनी मोदी मोहिमेसाठी रणनीती आखणे सुरु केले आणि ते देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रशांत किशोर यांचा प्रवास दाखवतो की, सामुदायिक सेवा, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक नियोजन यांचा संगम राजकारणातही किती प्रभावी ठरतो.

नेत्यांसाठी विजयी रणनीतीचे शिल्पकार : प्रशांत किशोर

प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे नेत्यांसाठी विजयी रणनीतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. २०१३ मध्ये त्यांनी CAG या संस्थेची स्थापना करून २०१४च्या मोदी मोहिमेची रणनीती आखली. ही रणनीती इतकी अचूक आणि धक्कादायक ठरली की भारतीय निवडणूक प्रचाराचा चेहरा पूर्णपणे बदलून गेला. त्यांच्या नावावर गेलेले काही महत्त्वाचे प्रयोग, चाय पे चर्चा, 3D रॅली, टॅन फॉर युनिटी, मंथन, डेटा-आधारित मायक्रो-टार्गेटिंग हे प्रयोग त्यांना देशातील जवळपास सर्व महत्त्वाच्या नेत्यांसाठी विजयी रणनीतीकार बनविण्यात मदत केली जसे की नितीश कुमार, ममता बॅनर्जी, एम.के. स्टालिन, जगन रेड्डी, अमरिंदर सिंग, अरविंद केजरीवाल. PK यांनी स्वतः मान्य केले आहे की, त्यांचे सर्व यश इतरांच्या संघटनांवर आधारित होते. त्यांच्या रणनीतीचा पाया होता क्लायंटकडे आधीपासून असलेली संघटनात्मक ताकद, स्थानिक रूट्स आणि सामाजिक समीकरणे. मात्र, जेव्हा PK यांनी स्वतः राजकारणात उडी घेतली, तेव्हा हेच समीकरण त्यांच्या विरोधात उभे राहिले, ज्यामुळे राजकीय संघर्ष अधिक जटिल झाला.

२०२४ मध्ये प्रशांत किशोरने केली जन सुराज पक्षाची भव्य घोषणा

२०२४ मध्ये प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी जन सुराज पक्षची घोषणा मोठ्या दिमाखात केली. त्यांच्या घोषणेतून स्पष्ट होते की “बदल हवा” ही लोकांची आकांक्षा त्यांनी पूर्ण करण्याचा मानस धरला होता. प्रशांत किशोर यांनी दावा केला की त्यांनी बिहारच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या प्रयत्नासाठी ३ हजार किलोमीटरची पदयात्रा केली आणि “हड्डी जळाली” असे सांगत स्वतःच्या कष्टांचा उल्लेखही केला. डिजिटल माध्यमात त्यांचा प्रचारही जोरदार होता, ज्यामुळे ३० कोटी व्ह्यूज मिळाले. तसेच, त्यांनी असा अंदाज वर्तवला की ५० ते ७० लाख स्थलांतरित बिहारकर या मोहिमेपर्यंत पोहोचले आहेत, आणि त्यापैकी किमान दोन-तृतीयांश लोक आमच्या पक्षाकडे येतील हा दावा त्यांनी केला. या सर्व आकांक्षा आणि दावे पाहता, प्रशांत किशोर स्वतःच अपेक्षांच्या जाळ्यात अडकले असे दिसते.

रणनीतीचा बादशाह पण बिहारमध्ये फक्त शून्यावर मोजला गेला

प्रशांत किशोर यांनी २४० जागांवर उमेदवार उभे करून बिहारच्या राजकीय नकाशावर स्वतःची भव्य छाप पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने भूगोल बदलण्याचा आरसा दाखविला, पण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात काही प्रमुख अडचणींनी जन सुराजचा वेग मंद केला. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक मुळांची कमकुवतता, जातीच्या समीकरणांवर भक्कम पकड नसणे, पाटण्यातील राजकीय वर्तुळाने या परिस्थितीचा अंदाज आधीच व्यक्त केला होता, आणि निकालांनी त्याची पुष्टी केली. या निवडणुकीत प्रशांत किशोर जिंकू शकले नाहीत, तसेच स्पर्धेतही त्यांचा ठसा उमटला नाही. रणनीतीचा बादशाह असलेला प्रशांत किशोर, स्वतःच्या मैदानातच शून्यावर मोजला गेला. हा पराभव नव्हे, तर ‘भूगोल बदलण्याचा आत्मविश्वास’ विरुद्ध ‘भूगोलाने दाखवलेली वास्तवता’ असा ठरला. त्यांनी आयुष्यभर ज्या नेत्यांसाठी विजयाचा रोडमॅप तयार केला, त्याच नकाशावर स्वतःला स्थान शोधताना पहिल्याच वेळी पूर्णपणे गडगडावे लागले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा