Friday, November 14, 2025

नवी पार्टी, नवे समीकरण ; महुआत तेज प्रतापांची परीक्षा

नवी पार्टी, नवे समीकरण ; महुआत तेज प्रतापांची परीक्षा

बिहार : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वच जागांवरून पहिल्या टप्प्यातील आकडे समोर येत आहेत. महुआ ही जागा या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ ठरला आहे. कारण या जागेवरून माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे मोठे सुपुत्र आणि जनशक्ती जनता दलचे नेते तेज प्रताप यादव रिंगणात आहेत.

तेज प्रतापांची चुरशीची लढत

महुआमधील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये तेज प्रताप यादव मागे पडल्याचे दिसले होते. मात्र काही वेळाने त्यांनी पुन्हा आघाडी घेतली. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत मात्र अनपेक्षित घडामोड झाली आणि तेज प्रताप यादव पुन्हा पिछाडीवर गेले. सध्या या जागेवर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे संजय कुमार सिंह आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत.

महुआ मतदारसंघात ६ नोव्हेंबरला मतदान पार पडले. या जागेवर जनशक्ती जनता दलचे तेज प्रताप यादव, राष्ट्रीय जनता दलचे मुकेश कुमार रोशन आणि एलजेपी(आर) चे संजय कुमार सिंह यांच्यात तिरंगी लढत रंगत आहे.

तेज प्रताप कोण आहेत?

तेज प्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे मोठे पुत्र. त्यांनी आरजेडीमधील फोटो वादानंतर पक्ष सोडला आणि स्वतःची जनशक्ती जनता दल ही नवी पार्टी स्थापन केली. याच पक्षाच्या तिकिटावरून ते या वेळी मैदानात उतरले आहेत.

तेज प्रताप सध्या ३६ वर्षांचे असून त्यांचे शैक्षणिक पात्रता १२वी पर्यंत आहे. त्यांच्यावर आठ गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. त्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत २.९ कोटी रुपये इतकी आहे. वेगळ्या आणि हटके अंदाजामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

भावनिक क्षण

नामांकन दाखल करताना तेज प्रताप यादव आपल्या आजीचा फोटो घेऊन पोहोचले होते. “माझी आजी माझ्यासाठी सर्वात मोठा आधार आहे. त्यांच्या आशिर्वादाने केवळ महुआच नव्हे तर इतर जागाही आम्ही जिंकणार,” असे त्यांनी तेव्हा सांगितले होते. त्यांच्या नामांकनाची खास चर्चा झाली कारण या वेळी त्यांच्या सोबत कुटुंबातील कोणताही सदस्य उपस्थित नव्हता. आरजेडीमध्ये परत जाण्याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >