पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय जनता पार्टी (BJP) बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष झाली. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टी ८२ जागांवर जिंकली आणि ७ जागांवर आघाडीवर आहे. जनता दल युनायटेड (JDU) ७५ जागांवर जिंकली आणि १० जागांवर आघाडीवर आहे. लोकजनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) १७ जागांवर जिंकली आणि २ जागांवर आघाडीवर आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर (HAMS) ५ जागांवर जिंकली आहे तर राष्ट्रीय लोक मोर्चा ४ जागांवर जिंकली आहे. बिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०२ जागांवर एनडीए विजयी किंवा आघाडीवर आहे. भाजपच्या नेतृत्वात एनडीएने विरोधकांचा धुव्वा उडवला.
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे मॉडेल आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुशासनाचे मॉडेल लोकप्रिय झाले. जनतेची या दोन्हीला पसंती लाभली. पंतप्रधान मोदींनी जंगलराजच्या मुद्यावरुन थेट लालूप्रसाद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाला लक्ष्य केले तर राज्य सरकारने निवडणुकीच्या काही दिवस आधीच कल्याणकारी योजनांचा पाऊस पाडला. याचा एनडीएला निवडणुकीत फायदा झाला.
मराठा चेहरा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी, पक्षनिष्ठा यामुळे महाराष्ट्रातले नेते असलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडेंनी संघटनात्मक पातळीवर पक्षाचे काम प्रभावीरित्या केले. एनडीएच्या ऐतिहासिक विजयात विनोद तावडे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांचीही उत्तम साथ लाभली. या जोडगोळीने बिहारमध्ये भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवले. लोकगायिका मैथिली ठाकूर यांना भाजपमध्ये आणण्यात विनोद तावडेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व प्रयत्नांला यश लाभले. बिहारमध्ये भाजपने अभूतपूर्व असे यश मिळवले.






