Friday, November 14, 2025

बिहारमध्ये एनडीएची सत्ता, भाजप सर्वात मोठा पक्ष

बिहारमध्ये एनडीएची सत्ता, भाजप सर्वात मोठा पक्ष

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले. आता मतमोजणी सुरू आहे. हाती आलेले आतापर्यंतचे कल बघता भारतीय जनता पार्टी ९० जागांवर तर जनता दल युनायटेड ८२ जागांवर, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान गट) २० आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) ५ जागांवर आघाडीवर आहे. एनडीएने आतापर्यंत १९७ जागांवर आघाडी घेतली आहे. बिहारमध्ये बहुमताचा जादुई आकडा १२२ आहे. एनडीएने तर त्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन स्वतःची बाजू भक्कम केली आहे. विरोधात असलेल्या महागठबंधनने निराशाजनक कामगिरी केली आहे. राष्ट्रीय जनता दल २८ जागांवर, काँग्रेस ५ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ३ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतची स्थिती बघता बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरणार असे चित्र आहे. जनता दल युनायटेड राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष झाला आहे.

बिहारमध्ये सध्या नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. पण भाजप राज्यात मोठा पक्ष झाल्यामुळे आता मुख्यमंत्री नितीश होणार की भाजपचा एखादा आमदार होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. भाजपचे नेते सध्या एनडीएचा विजय हा मुद्दा मांडत आनंद साजरा करत आहेत. पण मुख्यमंत्री या विषयावर बोलणे टाळत आहेत. यामुळे बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला तरी मुख्यमंत्री या पदावरुन पुढील काही दिवस राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ (आघाडीवर)

भाजप ९० जेडीयू ८२ एलजेपी (रामविलास पासवान गट) २० एचएएम ५ आरजेडी २८ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ३ एमआयएम ५ काँग्रेस ५ राष्ट्रीय लोकमोर्चा ४ बसप १

बिहारमध्ये एकूण मतदार

बिहारमध्ये ७४.२ दशलक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. यात ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३५ दशलक्ष महिला आहेत. विधानसभेसाठी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६५.०८ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ६८.७६ टक्के मतदान झाले.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२०

भाजप - ७४

जेडीयू - ४३

आरजेडी - ७५

काँग्रेस - १९

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - ९

एमआयएम - ५

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >