Friday, November 14, 2025

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला आहे. खराब सूर्यप्रकाशामुळे पंचांनी काही वेळ सामना सुरू ठेवला, पण हिवाळा असल्याने लवकर अंधार पडतो. त्याचप्रमाणे अंधार पडू लागल्याने खेळ लवकर बंद करण्यात आला.

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीपुढे आफ्रिकेच्या खेळाडूंनी सपशेल शरणागती पत्करली. बुमराहच्या या नेत्रदिपक गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव १५६ धावांमध्ये गुंडाळला. बुमराहला अन्य गोलंदाजांनी चांगली साथ दिली. बुमराने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १६ व्यांदा एका डावात पाच बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली, तर सलामीवीर एडेन मार्करामने सर्वाधिक ३१ धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला १५६ धावांवर सर्वबाद केल्यानंतर फलंदाजी करताना २० षटकांत १ बाद ३७ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल व वॉशिंग्टन सुंदरने संघाचा डाव सावरला.

ईडन गार्डन्स स्टेडियमवर कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु संघाने पहिल्या तासातच आपले सलामीवीर गमावले. टी ब्रेकपर्यंत आठ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. शेवटच्या सत्राच्या तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने सायमन हार्मर आणि केशव महाराज यांना बाद केले, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांवर बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ३७ धावा केल्या होत्या. केएल राहुल १३ आणि वॉशिंग्टन सुंदर ६ धावांवर नाबाद राहिले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल १२ धावांवर बाद झाला, त्याला मार्को यान्सनने बोल्ड केले.

जसप्रीत बुमराहचा विक्रम

या डावात ५ गडी बाद करताच बुमराहच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १६ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह त्याने भारताचे माजी गोलंदाज भागवत चंद्रशेखर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतीय संघासाठी खेळताना आर अश्विनने ३७ वेळा, अनिल कुंबेळेंनी ३५ वेळा, हरभजन सिंगने २५ वेळा, कपिल देव यांनी २३ वेळा ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह बुमराहच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये बांगलादेशविरूद्ध झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना ईशांत शर्माने गोलंदाजी करताना पहिल्याच दिवशी ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्याआधी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना डेल स्टेनने २००८ मध्ये खेळताना हा विक्रम आपल्या नावे केला होता. दरम्यान ६ वर्षांनंतर भारतात गोलंदाजी करताना, पहिल्याच दिवशी ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.

कुलदीपची संघातून रिलीज करण्याची मागणी

कुलदीप यादवने बीसीसीआयकडे सुट्टी मिळावी अशी विनंती केली आहे. या महिन्याच्या अखेरीस कुलदीप यादव लग्न करणार असून याकरता त्याने सुट्टीसाठी अर्ज केला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग नियोजित तारखेपेक्षा उशिरा संपल्यामुळे त्याचं लग्न पुढे ढकलावं लागलं होतं. कुलदीपने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यासाठी सुट्टीची विनंती केली आहे. भारत २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे, तर दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरला रांचीमधून सुरूवात होणार आहे. कुलदीपच्या सुट्टीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

Comments
Add Comment