Thursday, November 13, 2025

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक

मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. मात्र, या निवडणुकांमध्ये निवडणूक चिन्हांच्या वाटपावरून मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, केवळ मोजक्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांकडेच राखीव निवडणूक चिन्हे आहेत. उर्वरित सर्व पक्षांना प्रत्येक वॉर्ड किंवा मतदारसंघात वेगळे मुक्त चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागेल. यामुळे प्रचार मोहिमेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून, विशेषतः छोट्या पक्षांना मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण होईल.

राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत एकूण ४३५ राजकीय पक्षांची यादी देण्यात आली असून, त्यापैकी केवळ मूठभर पक्षांकडेच राखीव चिन्हे आहेत. बाकी सर्वांना आयोगाकडे उपलब्ध असलेल्या मुक्त चिन्हांमधून वाटप होणार आहे. ही मुक्त चिन्हे १९४ इतकी असून, ती प्रत्येक निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय वेगळी मिळू शकतात. यामुळे छोट्या आणि नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षांना प्रचार करताना अतिरिक्त प्रयत्न करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या तपशिलानुसार, राष्ट्रीय पक्षांची संख्या ५ आहे. यात भाजप (कमळ), भाकप (मार्क्सवादी) (हातोडा, विळा आणि तारा), बसपा (हत्ती), काँग्रेस (हात) आणि आम आदमी पक्ष (झाडू) यांचा समावेश आहे. हे पक्ष देशभरात एकसमान चिन्ह वापरू शकतात.

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षही ५ आहेत, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (घड्याळ), शिवसेना (धनुष्यबाण), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस) यांचा उल्लेख आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांच्या चिन्हांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा उल्लेख अधिसूचनेत करण्यात आला असून, ते अंतिम निर्णयाच्या अधीन आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

४१६ नोंदणीकृत पक्षांना मुक्त चिन्हांचा आधार :

उर्वरित ४१६ पक्ष हे नोंदणीकृत, पण अमान्यताप्राप्त आहेत. यात वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जन सुराज्य शक्ती, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), भारीप बहुजन महासंघ यांसारखे पक्ष आहेत. या पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुक्त चिन्ह घेऊन उतरावे लागेल. आयोगाच्या आदेशानुसार, मुक्त चिन्हांची यादीही राजपत्रात देण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >