बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई
मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या (एजीएलआर) रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या २४ बांधकामांवर महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाच्या वतीने गुरुवारी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी हटवण्यात आली. ही सर्व बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. तसेच, या जोड मार्गावरील नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामांमध्ये बाधित होणाऱ्या ३५ बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येणार असून हे काम प्रगतिपथावर आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीखाली तसेच सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीने घाटकोपर (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गादरम्यान १५.२५ मीटर रुंदीचा विकास नियोजित रस्ता बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगत असलेल्या काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याच्या बांधकामामुळे बाधित झालेल्या २४ बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. तसेच, याच परिसरात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) यांच्याकडून नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान बाधित होणाऱ्या ३५ बांधकामांचे करण्याची कारवाईही प्रगतिपथावर आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या कामकाजात अडथळा ठरणाऱ्या मालमत्ताधारकांना रितसर सूचना देऊन तसेच नुकसानभरपाई देऊन त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.






