इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन सुपर लीगला (आयएसएल) यंदाच्या मोसमात अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे फुटबॉलपटू, प्रशिक्षक, चाहत्यांचे नुकसान होत आहे. राग, निराशा अन् हतबलता वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आयएसएल ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची आर्त हाक भारतातील फुटबॉलपटूंकडून मारण्यात आली आहे.
अखिल भारतीय फुटबॉल संघटना व रिलायन्स यांच्या पुढाकाराने आयएसएल ही स्पर्धा १५ वर्षे सुरू होती, मात्र कराराचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे यंदा अद्याप या स्पर्धेचा श्रीगणेशा झालेला नाही. गेल्या आठवड्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून सांगण्यात आले की, आयएसएलच्या व्यावसायिक हक्कांसाठी मागवलेल्या प्रस्तावांना कोणतीही बोली मिळालेली नाही. ही बोली १६ ऑक्टोबरला मागवली होती. तसेच आगामी करार १५ वर्षांचा असणार होता.
भारतीय फुटबॉल संघातील स्टार खेळाडू संदेश झिंगन या वेळी भावुक होऊन म्हणाला की, “खेळाडू, प्रशिक्षक, चाहत्यांना स्पर्धा केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा आहे. आम्ही खूप मेहनत केली. खूप काही दिले आहे. पण मोसम न खेळताच संपत चालला आहे.” पुढे तो सांगतो की, “संपूर्ण भारतीय फुटबॉल व्यवस्था अनिश्चिततेत आहे. स्वप्ने थांबली आहेत. भविष्य प्रश्नचिन्हाखाली आहे. प्रत्येक दिवस आम्ही थांबतो आहोत. भारतीय फुटबॉल पूर्वपदावर आणण्यासाठी कृतीची वेळ आली आहे.” सुनील छेत्री व गुरप्रीत सिंग संधू या फुटबॉलपटूंनीही सोशल माध्यमावर आपले मत व्यक्त केले आहे. ते सांगतात की, “आम्ही आयएसएलमध्ये खेळणारे व्यावसायिक फुटबॉलपटू एकत्र आलो आहोत. आमचा एकच संदेश आहे. आम्हाला खेळायचे आहे. तेही आता लगेच. आमचा राग, निराशा आणि वेदना आता बदलत चालली आहे. आमच्या प्रिय खेळाला पुन्हा उभारी देण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यास तयार आहोत.” अशा शब्दांत त्यांनी भावना मांडल्या.






