दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५ रँकिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर बाबर आझम दोन स्थानांनी घसरून ७ व्या स्थानावर पोहोचला.
रोहित शर्मा (७८१ गुण) पहिल्या स्थानावर कायम आहे, तर कर्णधार शुभमन गिल (७४५ गुण) चौथ्या स्थानावर आहे. शिवाय, तिलक वर्मा टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी घसरून ७६१ गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा पथुम निस्सांका (७७९ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे आणि जोस बटलर (७७० गुण) चौथ्या स्थानावर आहे.
पाकिस्तानचा सलमान आगा आणि फिरकी गोलंदाज अबरार अहमद यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठली आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांच्या प्रभावी कामगिरीचा फायदा दोघांनाही झाला आहे.
सलमानने रावळपिंडीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८७ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या होत्या. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६९ धावा केल्या होत्या. तो फलंदाजांच्या यादीत १४ स्थानांनी पुढे सरकला आहे आणि तो १६ व्या स्थानावर पोहोचला आहे.
टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत शुभमन गिल ८ स्थानांनी पुढे सरकला आहे आणि २२ व्या स्थानावर पोहोचला आहे. गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४६ आणि २९ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडचा टिम रॉबिन्सन १८ स्थानांनी पुढे सरकला आहे आणि २३ व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा रोवमन पॉवेल ४ स्थानांनी पुढे सरकला आहे आणि ३० व्या स्थानावर पोहोचला आहे.
न्यूझीलंडचा जेकब डफी गोलंदाजांच्या क्रमवारीत ६ स्थानांनी पुढे सरकला आहे आणि तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मिचेल सँटनर ५ स्थानांनी आपल्या क्रमावारती सुधारणा केली आहे आणि २३ व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा रोस्टन चेस ३२ व्या स्थानावर आहे.
इंग्लंड संघ कसोटी संघ क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर आहे. कांगारू संघाचे १२४ रेटिंग गुण आहेत. ११२ गुणांसह इंग्लंड आणि १११ गुणांसह दक्षिण आफ्रिका अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. १०८ गुणांसह भारत चौथ्या स्थानावर आहे.






