डॉ. साधना कुलकर्णी
बालकदिनाचा खरा उद्देश म्हणजे बालक आपल्या समाजाचे भविष्य आहे याचे स्मरण समाजाला होणे आणि हे भविष्य सुरक्षित असावे म्हणून बालकांप्रती समाजाच्या जबाबदारीची जाणीव वाढीस लागणे. प्रत्यक्षात एक सामाजिक घटक म्हणून किंवा पालक म्हणून आपली वागणूक बालकदिनाच्या उद्देशाला पूरक आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. १४ नोव्हेंबरच्या बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ही संधी घेता येते.
शीर्षक वाचून मनात गोंधळ उडाला असणार. हरकत नाही. बालक आणि पालक यांचे एकमेकांशी कसे संबंध असावेत, हा विषय कायमच ज्वलंत राहणार आहे. प्रामुख्याने हे संबंध तपासताना आमचे पालक, आमचे लहानपण, आमचे पालकपण... या फुटपट्ट्या लावल्या जातात आणि नेमका तिथेच गोंधळ होतो. असो. निमित्त आहे बालक दिनाचे आणि नुकताच ‘केबीसी’मध्ये इशित भट्ट हॉट सीटवर विराजमान झाल्यानंतरचा प्रसंग. या प्रसंगाच्या खोलात शिरण्याची गरज नाही, कारण तो सगळ्यांना माहीत आहे. या प्रसंगावर पालक, शिक्षक, समुपदेशक, बालमानसशास्त्रज्ञ, लाईफ कोच सगळ्यांनाच व्यक्त व्हावंसं वाटलं. त्यांनी लिखाणातून आपली मतं मांडली. सामान्य जनतेने गप्पांमधून, बडबड करून यथेच्छ तोंडसुख घेतलं. कुणी समाजमाध्यमाला, कुणी पालकत्वाला, कुणी शिक्षणपद्धतीला, कुणी संस्कारशून्य पिढीला तर कुणी विभक्त कुटुंबपद्धतीला जबाबदार ठरवलं. खरं तर, दुसऱ्याकडे बोट दाखवलं की उरलेल्या तीन बोटांची दिशा स्वतःकडे असते, हा साधा नियम आपण विसरून गेलोय. समोरच्याला दोषी ठरवण्यासाठी आम्ही इतके उतावीळ, उत्तेजित आणि सर्वज्ञानी असतो की त्या भरात तारतम्य न ठेवता भाष्य करण्याचीच आम्हाला प्रौढी वाटते. किंबहुना, त्यासाठी हल्ली काही ना काही निमित्तच हवं असतं आणि तसं नसेल तर ते निमित्त शोधून काढलं जातं. त्यावर चर्चेचा धुरळा उडतो. मतमतांतरांचं मंथन होतं आणि काहीही निष्पन्न न होताच सगळं काही शांत होतं, विस्मरणात जातं.
इशीत भट्ट हा लहान मुलगा. जेमतेम दहा - बारा वर्षांचा मुलगा. या वयाची मुलं आपल्या घरात असली की हल्लीची पिढी काय हुषार आहे नाही, हे वाक्य आपण दिवसातून कमीत कमी तीनदा तरी आळवतो. पण हीच मुलं शेजारच्या घरात असली की आगाऊ आणि भोचक वाटू लागतात. इशीत भट्ट हा मुलगा नेमका ‘केबीसी’मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर आल्यामुळे या प्रसंगाची प्रसिद्धी कमालीची वाढली. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल ज्या भावना, जी आदरयुक्त भीती, जे दडपण मोठ्यांना येतं, तसं इशीत भट्टला वाटणं शक्यच नाही. अमिताभ बच्चनला प्रत्यक्ष समोर बघताना अतिउत्तेजित होऊन ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ या भावनेने भल्याभल्यांना सुचेनासे होते, हे आपण अनेकदा बघितले आहे. पण इशीतच्या पिढीने केवळ केबीसीमध्ये आणि जाहिरातीतच त्यांना बघितलं असण्याची शक्यता आहे आणि तेही घरी नियमित केबीसी बघितले जात असेल तरच. पालकांनी अमिताभच्या व्यक्तिमत्त्वाचा आवाका इशीतला सांगितला असेलही. पण ती माहिती गांभिर्याने घेण्याचं त्याचं वय नाही आणि तेवढी त्याला समजही नाही. इशीत उद्धटपणे, आगाऊपणे वागला असं भाष्य करणाऱ्यांनी लहान मुलांचे नृत्याचे आणि संगीताचे रिॲलिटी शो बघावेत. लहान मुले बघत असलेल्या कार्टून्समधल्या पात्रांचा अभ्यास करावा. जाहिरातीतली लहान मुलं बघावीत आणि रोजच्या हिंदी आणि मराठीमधल्या संस्कारी मालिका बघाव्यात.
जेमतेम अर्धा तास इशीत हॉट सीटवर होता आणि तेवढ्याच वेळात त्याच्या वागण्यावर गदारोळ उठला. ज्यावेळी याच वयाची मुलं रिअॅलिटी शोमध्ये नृत्य करतात, गाणी गातात, त्यावेळी तर अनेकदा वयाला न साजेशा गाण्यांची निवड केली जाते. त्यावर नृत्य करताना उत्तेजक हावभाव, विचित्र स्टेप्स बघणं असह्य होतं. या शोमधले परीक्षकही डोकं गहाण ठेवून केवळ कौतुक करण्यासाठी आणि छचोरपणा करण्यासाठी बसलेले असतात. परफॉर्मन्सच्या मध्ये सुरू असलेली हुल्लडबाजी आणि वाह्यातपणा बघता संतापाशिवाय दुसरी कोणतीच भावना मनात येत नाही. स्पर्धकांच्या जोड्या जमवल्या जातात, त्यांना एकमेकांवरून चिडवलं जातं. प्रपोज करणं, क्रश, ब्रेकअप, लव्ह ट्रँगल... ही भाषा सतत वापरली जाते आणि या प्रकाराचं प्रचंड कौतुक केलं जातं. म्हणजे प्रत्यक्षातही असंच वागायचं असतं अशी स्पर्धकांची समजूत होतेच, पण बघणाऱ्या असंख्य लहान मुलांचीही खात्री होते. परफॉर्मन्सवर टिप्स, चुका समजावणं, सुधारणा करणं या बाबी महत्त्वाच्या नसतातच. प्रत्येक परीक्षक शब्दकोषात कौतुकभरल्या नवीन शब्दांची मोलाची भर टाकण्याचे काम नेमाने करत असतो. फक्त कौतुक आणि तोंडी लावायला रडणं. रडणं हे भावनिक बुद्ध्यांक दाखवणारं. त्याचं प्रदर्शन पण अत्यावश्यक. स्पर्धक, परीक्षक, प्रेक्षक यांनी टिपं गाळून आपल्या ‘संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणं’ ही अट पाळली की पुढच्या राऊंडच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. शास्त्र असतं ते. त्यामुळे टिपं गाळण्याचं हे संसर्गजन्य अस्त्र कायम सगळेचजण भात्यात ठेवून असतात.
अशा रिॲलिटी शोवर कुणीच काहीच कसं बोलत नाही? इशीत तर फक्त अर्धा तास पडद्यावर होता. बाकी शोमधील मुलं तर दर आठवड्याला पडद्यावर येतात आणि परीक्षक आणि स्पर्धकांचे निरर्थक संवाद, माकडचाळे बघावे लागतात. निषेध करायचा, टीका करायची किंवा गदारोळ करायचा, तर केबीसीतल्या इशीतवरच का? तसंच अनेकांच्या घरी टीव्हीवर मालिका बघितल्या जातात. वडीलधारी बघतातच, पण त्याचा कळत-नकळत परिणाम लहानांवरही होत असतो. शून्य अभिरूची आणि बुद्धीशी फटकून असलेल्या या मालिकांमध्ये नकारात्मक व्यक्तिरेखांचे उदात्तीकरण इतक्या जास्त प्रमाणात दाखवले जाते की अशी पात्रं प्रत्यक्षातही असणार, यावर लहान मुलांचा नक्कीच विश्वास बसू लागतो. फरशीवर तेल सांडवणं, पदार्थात मीठ/ तिखट ओतणं, गॅसचा नॉब उघडून ठेवणं, कपड्यांवर शाई सांडवणं... बालबुद्धीलाही लाजवतील अशा अभिनव कल्पनांचा सुकाळ असणाऱ्या या मालिका लहान पिढीवर काय परिणाम करत असतील याचा विचारही करवत नाही. हीच बाब मुलांच्या कार्टून शोबद्दल. त्यातली पात्रं तर कमालीची आगाऊ, वात्रट आणि वाचाळ असतात. लहान मुलं तर या कार्टून्सच्या आकंठ प्रेमात बुडालेली असतात. अशा वेळी त्यांचं अनुकरण मुलांनी केलं नाही तरच नवल.
हे सगळे टीव्हीच्या माध्यमातून होणारे संस्कार. पण घरातल्या पालकांकडून काय घडतं? लहान मुलांनी काढलेली चित्रं, गायलेली गाणी, कविता, केलेला नाच, फॅन्सी ड्रेस या सगळ्यांचं शूटींग करून रील्स काढली जातात, पोस्ट केली जातात. मग त्यानंतर पडणारा कौतुकाचा आणि लाईक्सचा पाऊस.. हे सगळे कुळाचार घरी यथास्थित पार पडत असल्याने लहान मुलांना ते नॉर्मल वाटू लागतं. कौतुक, प्रसिद्धी, रील, फोटो या दैनंदिन जगण्यातल्या आवश्यक बाबी आहेत असा त्यांचा समज होत असेल तर नेमका दोष कुणाचा? मुलांनी काहीही केलं तरी टाळ्या पडल्याच पाहिजेत, हा पालकांचा अट्टाहास मुलांवरही परिणाम करतो. आपल्यावर टीका केलेली मुलांना अजिबात सहन होत नाही. कोणतीही कृती करण्याच्या आनंदापेक्षा त्याचं प्रदर्शन करणं मुलांना महत्त्वाचं वाटू लागतं. अगदी अतिरेक म्हणजे काही पालक मुलांच्या गुणपत्रिकासुद्धा समाजमाध्यमावर टाकतात. याशिवाय हल्लीच्या पालकत्वानुसार मुलं आणि आई-वडिलांचे मैत्रीपूर्ण संबंध असावेत असं शास्त्र आहे. पण प्रसंगी मैत्रीची मर्यादा ओलांडून ही मुले दादागिरी कधी करू लागतात हे समजतही नाही. त्यामुळे आजच्या कुटुंबात सगळ्यात जास्त धाक कुणाचा असेल, तर तो लहान मुलाचा. त्याची आवडनिवड, त्याचे हट्ट त्याच्या मागण्या, त्याचे लाड ही पालकांची प्राथमिकता झाली आहे. ही मुलं आई-वडिलांशी, आजी-आजोबांशी, पाहुण्यांशी उद्धटपणे बोलतात. अशा वेळी इशीतवरच दोषारोपण का?
आज समाजात संस्कारवर्गाची खरी आणि महत्त्वाची भूमिका बजावली जाते आहे ती तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांद्वारे. या वेगवान त्सुनामीमध्ये सगळेच भरडून निघताहेत. पण खरी फरपट होते आहे ती लहान मुलांची. त्यांना या माध्यमाचे आकर्षण वाटणं, त्यावर विश्वास बसणं, त्यांनी या आभासी दुनियेचं अनुकरण करणं हे साहजिकच आहे, कारण त्यांचा जन्मच मुळी हातात स्मार्टफोन घेऊन झाला आहे. पण त्सुनामीच्या या लाटेत पालकही वाहवत जायला लागले तर कसं होईल? आज गोकुळाष्टमी म्हणजे दहीहंडीचा उत्सव, गणेशोत्सव म्हणजे मिरवणुका आणि ढोल, नवरात्र म्हणजे नऊ रंगाचे कपडे आणि गरबा, दिवाळी म्हणजे रोषणाई, फटाके आणि भेटवस्तू... असे लहान पिढीचे समज झाले आहेत. हे चुकीचे समज कुणामुळे? आपणच आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खरं तर अशा वेळी एका दीपस्तंभाप्रमाणे आज पालकांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मुलं कुठेही भरकटली तरी त्यांना त्यांचा दीपस्तंभ पालकांनी उपलब्ध करून दिला पाहिजे. दुर्दैवाने आजच्या वेगवान तंत्रयुगात पालकांच्या हाती मोजकेच पत्ते उरले आहेत. अनेक आगाऊ, अनावश्यक बाबींवर त्यांचा ताबा असूच शकत नाही. बाहेरच्या प्रत्येक प्रलोभनावर पालकांनी नियंत्रण ठेवणं अशक्य आहे. पण उरलेले हातातले पत्ते हे हुकुमाचे असणं ही आजच्या काळाची गरज आहे. मग पालकांनी नेमकं करावं तरी काय? पालकांनी इतरांना दोष न देता, आपलं लहानपण आठवावं. आई-वडिलांची वागणूक आठवावी. आपल्या स्वतःच्या पालकांचाच आदर्श समोर ठेवून वागलं नाही, तर भविष्य कठीण असणार आहे. म्हणूनच २०२५ च्या बालकदिनाच्या निमित्ताने ‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे। पालकांनी बालकांशी पालकासम वागणे।’






