Wednesday, November 12, 2025

मराठी शाळा : मायमराठीचा कणा!

मराठी शाळा : मायमराठीचा कणा!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर

मराठी अभ्यासकेंद्राने नेहमीच ठाम भूमिका घेऊन मराठीविषयक प्रश्नांवर आवाज उठवला. या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध लोकशाही मार्गाने घेतला. मराठी शाळा हा मराठी भाषेच्या विकासातील मुख्य आधार आहे, हा केंद्राच्या विचारप्रणालीशी निगडीत प्रमुख मुद्दा राहिला. महाराष्ट्रातील गावोगावच्या मराठी शाळा, बेळगावातील मराठी शाळा, जागतिकीकरणानंतर बदललेल्या वातावरणात एकाकी पडलेल्या मराठी शाळांच्या मागे केंद्र खंबीरपणे उभे राहिले.

मराठी शाळांची पडझड या विषयाने महाराष्ट्रीय समाज किती अस्वस्थ झाला? महानगरांचे परीघ इंटरनॅशनल शाळांनी व्यापून टाकले. मराठी शाळांच्या जागांवरच सीबीएसई आणि अन्य बोर्डांच्या शाळा उभ्या राहिल्या. पालकांना मराठी शाळा नको आहेत हे कारण पुढे करून संस्थाचालकांनीच इंग्रजी शाळांना मोठे केले. दुदैवाने शासन कोणतेही असो, मराठी शाळांचा वाली बनणे कुठे कुणाला हवे होते? मराठी शाळा म्हणजे नको असलेले ओझे झाले. अस्वच्छ वर्ग, घाणेरडी स्वच्छतागृह, रंग उडालेल्या भिंती, मुलांसाठी आवश्यक शैक्षणिक साधनांचा अभाव, सोयी सुविधांचे बारा वाजलेले! अशा अवस्थेत तालुक्यात -शहरांत मराठी शाळा कशाबशा तग धरून उभ्या राहिल्या. ग्रामीण भागात

मराठी शाळांची आणखीनच चित्तरकथा! कधी बृहद्आराखडे धाब्यावर बसवले गेले, तर कधी गावातल्या मुलींचे प्रश्न लक्षात न घेता अचानकपणे एखादी शाळा विना मान्यता ठरवून तिचे अस्तित्वच संपवले गेले. आदिवासी आश्रमशाळांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडले.

गेले काही दिवस मुंबईसारख्या शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मराठी शाळा धोक्यात आल्या आहेत. खरे तर मराठी शाळांच्या इमारती, त्यांची मैदाने यांच्यावर मराठी शाळांचाच अधिकार आहे पण काही ठिकाणी त्यांना धोकादायक ठरवून नष्ट करण्याचे डाव रचले जात आहेत. त्यांच्या जागी उंच टॉवर उभे करण्याची क्रूर तयारी सुरु होण्याची भीती आहे. मला आठवते, मराठी अभ्यास केंद्राने २००७ साली आयोजित केलेली मराठी शाळा वाचवायच्या कशा आणि कशासाठी ? ही परिषद झाली आणि मराठी शाळांचा लढा हळूहळू पेट घेऊ लागला.

या दरम्यान कार्यकर्त्यांना आलेले एक पत्र मला आजही आठवते आहे. ‘महानगर पालिकाच इंग्रजी शाळा सुरू करते आहे’ ही धोक्याची घंटा त्या पत्रातून घणाघणा वाजत होती. दरम्यान पालिकेने ‘मुंबई पब्लिक स्कूल’ सुरू केल्या. मराठी शाळा ओस पडू लागल्या. त्यांना घशात घालू पाहणारे आहेत तरी कोण ? हा प्रश्न विचारणारे मराठी अभ्यास केंद्र आज पुन्हा समाजाला हाक देते आहे. “मराठी भाषा जगवायची म्हणजे मराठी शाळा जगवायच्या” कारण त्याच आपल्या मायमराठीचा कणा आहेत.

Comments
Add Comment