माेरपीस : पूजा काळे
मॉली आमच्या एका थोरल्या भाचीची गोड मुलगी. तिचं पाळण्यातलं नाव मलिष्का. लाडात वाढल्याने तिला मॉली म्हणत. तिचा जन्म दिवाळीतल्या वसुबारसचा. गायीच्या वासरासारखी सतेज, नाजूका, चुणचुणीत आणि सुंदरही होती मलिष्का. अशी गोऱ्यामोऱ्या कांतीची पोर घरात वाढत असताना घराला निश्चित सौख्याचे दिवस येत होते. खरंतर तेव्हा आजी आजोबा व्हायचं आमचंही वय नव्हतं, पण दरम्यान नाती एवढी समृद्ध झाली की, नातेसंबंधात नवी नाती रूजत होती जी खुलवत गेली तनमनाला. सुरुवातीच्या आनंदातच आजीची बिरूदावली नकळत जोडली गेली. माझं वय तसं उमेदीचं, फक्त केसांनी रंग झटकून पांढरा रंग चढवला होता. त्यामुळे पहिल्यांदाच आजी म्हणवून घ्यायला थोड अवघडल्यासारखं वाटे पण जसजशी नातवंडांच्या संख्येत भर पडत गेली तशी अनुभवसमृद्ध झाले मी. नव्या नात्याचा अभिमान वाटू लागला. कारण एकच, वृद्ध होऊन नातवंडात रमण्यापेक्षा निव्वळ तरुणपण नातवंडात घालवलेलं कधीही उत्तम या मताची होते मी. नातवंडात घालवलेला वेळ म्हणजे सहा दिवसांच्या कामानंतर आलेला सुट्टीचा रविवारच जणू. निखळपणे आनंद देणाऱ्या माझ्या खूप साऱ्या नातवंडांसारखा. खरं तर या छोट्या मॉलीचा लळा लागण्याचं कारणही तसंच होतं. मॉली म्हणजे कापसाचा बोंडू, खाण्याची बोंब, चिमण्यांचा किलकिलाट आणि हट्टाचा डोंब. एकूण काय तर लाल गुलाबांच्या ताटव्यातलं गुलाबी रंगाचं फुल होतं ते. हे फुल वाढू लागलं तेव्हा बोबड्या बोलांनी घराला घरपण येत गेलं. दुडूदुडू धावणाऱ्या पावलांनी घरातले कानकोपरे ताल धरू लागले. नकळत माझे पायही मॉलीच्या घरची वाट धरू लागले. आम्ही तिचे चिक्कार फॅन झालो. तिचं रडणं, मुरडणं, नाटकी वागणं, अबोला धरणं यामध्ये वेळेचं भान विसरू लागलो. पुढील दोन अडीच वर्षांतच पोरगी हुशार झाली. सहज एकदा फिरायला मॉलमध्ये तिला घेऊन काय गेलो..! त्यानंतर मॉलीत झपाट्याने बदल होत गेले, ते कायम.
एकविसावं शतक उजाडलं ते मॉल संस्कृतीच्या मोठ्या आव्हानांनी. त्यामुळे किरकोळ माल-सामान, दाणागोटा असणाऱ्या वाण्याच्या दुकानांनी माना टाकल्या. कपडा, खान-सामान, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मोबाइल या सगळ्यांची सरसकट खरेदी करण्याचं एकमेव ठिकाण मॉल संस्कृतीनं आपल्याला देऊ केलं. नावीन्याची आस प्रगतिपथावर जाऊन एका उंचीवर पोहोचते असं म्हणतात, अगदी तस झालं होतं बघा. सामाजिक वैचारिकतेचा स्तर उंचावल्याने काळाला पुढे नेणारी झेप या लहानग्यांमध्ये रूजू लागली. मॉल संस्कृती आपल्याला कळायला काही काळ गेला पण मॉलीला काही दिवसात ती कळली. तिथ जाणं, दुकानातल्या रंगबिरंगी काचांकडे टकमक बघणं. खेळणी, कपडे पाहताना सारं काही परिचितासारखं. त्यामुळे आजी आज चौपाटी आणि गार्डन नको तर मॉलमध्ये जाऊया या लाडीक हट्टाला मी बऱ्याचदा बळी पडले गेले. तिथला बर्गर पिझ्झातला आनंद म्हणजे दुधावरची घट्ट सायचं जी मॉलीच्या मुखकमलावर दिसून येई. सरकत्या जिन्यावरचा प्रवास झोपाळ्यावर बसण्यापेक्षा भारी अगम्य होता.
एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यातला तिच्या वयातला शिरस्ता अगदी वेगळा होता. लाड, हट्ट, कौतुक आणि अनुकरण यामुळे तिच्या शिकण्याच्या व्याख्या बदलल्या. अॅटीट्यूड म्हणजे काय ते तिच्याकडून शिकायला मिळालं. बसताना, खाताना, फोटो काढताना मॉलीमधील मॉल अॅटीट्यूडचा अंदाज येई. वयाच्या चौथ्या वर्षी तिच्या कुशाग्र बुद्धीची धार जाणवली. एखादी गोष्ट कुठे घेतली विचारले असता, आमच्या मॉलमधून, हे ठरावीक उत्तर ती पटकन देई. पाढे म्हंटल्याप्रमाणे मॉलची भारंभार नाव घेत आज तिथं जायचं, आज इथं जायच हे मनोमनी ठरवून पायात बूट चढवून ती तयार व्हायची. अशी ही मॉली सरकत्या जिन्यातून जाता जाता पाच वर्षांची झाली. मग दहा वर्षांची झाली आणि आज पंधरा वर्षांची झालीय. होय काळ गेला तरी बालहट्ट सुटला नाहीए तिचा. अजूनही चेहऱ्यावर हट्ट घेऊन वावरते ती. नटणं, मुरडणं तिच्यात होतं जे आता बॅलन्स झालंय. डोईवर पदर, कंबरेवर बाहुली, नाकापर्यंत गजरा, हातात ड्रॉइंग पेपर, गळ्यात लोंबकळणारी ओढणी सांभाळत घरभर फिरणारी मॉली धावधाव धावायची. मैत्रिणीला लिहायला शिकवणारी मॉली, कौतुकाची कमळा होती. तेव्हा मॉलीनं फार त्रास न देता दिलेले आनंदाचे क्षण कायम स्मरणात आहेत. मॉलीच्या भाषेत सांगायचं झालं, तर शंभर टाइम्स लक्षात राहतील एवढे गोळा करून ठेवलेत मी. मुलं जवळ असतात तेव्हा त्यांच्या निरागस प्रेमापुढे धन्य होतो आपण. माझी अवस्था तशीच होती. लहानपणीचा काळ सुखाचा या ओळींची सत्त्यता पटते. तिचा प्रत्यय वारंवार येतो. मागे वळून पाहताना मॉलीच्या बाळ लीला आठवतात. मुलांबरोबर वावरताना आपण मुलात मुलं होऊन जातो. त्यांच्यासारखे हसतो, वागतो बोलतो. मुलं आपल्या मानसिकतेशी खूप जोडली जातात ज्याने आपले मनारोग्य सुधारते. घराला घरपण देणारी मुलं देवाघरची फुलं आहेत. आमच्या परिवारातील एक गोड मुलगी मलिष्का आज भव्य स्वप्न घेऊन दारात उभी आहे. तिच्या परीने ती मोठी होईल, नव्या स्वप्नांना नवा साज देईल, जेणेकरून आमचा अभिमान दुणावेल. आपल्याशी हा अनुभव शेअर करताना स्मरणात असलेली मॉली या न् त्या निमित्ताने डोकं वर काढते. आठवणींच्या जंजाळात माणूस रमतो हे खरं असेल तर एकदा भटकंती करावी या चिमण्यांच्या गावी. संत सांगून गेलेत, “लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.” निखळ हास्य आणि सुंदर जीवनासाठी या छोट्यांच्या दुनियेत जावे आणि छोटे व्हावे. “रोज वाटे या चिमुकल्यांची चिवचिव कानी पडे. चिमुकल्यांच्या संगतीने जीवनाचा अर्थ उलगडे.”






