मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेला आवळा हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. केस, त्वचा आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर फायदेशीर ठरतो. आहारात आवळ्याचा समावेश अनेक प्रकारे करता येतो – काहीजण तो भाजी स्वरूपात खातात, तर काहींना कच्चा आवळा खाणे आवडते.
रस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य – आवळा, कच्ची हळद, आले, कढीपत्ता आणि काळी मिरी.
हा रस तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. एका आवळ्यासोबत कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा, आल्याचा तुकडा आणि चिमूटभर काळी मिरी घ्या. हे सर्व घटक मिक्सरमध्ये एकत्र वाटून रस तयार करा. सकाळी रिकाम्या पोटी हा रस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
दररोज या रसाचे सेवन केल्याने त्वचेला नैसर्गिक तेज येते, केस मजबूत व मऊ राहतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. जर तुम्हाला केसगळती कमी करायची असेल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल, तर या पेयाला तुमच्या दिनक्रमाचा भाग जरूर बनवा.
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आवळ्याची भूमिका महत्त्वाची आहे. तो शरीरातील चयापचय वाढवतो आणि चरबी जळण्याची गती सुधारतो. याशिवाय भूक आणि अनावश्यक खाण्याची इच्छा नियंत्रित ठेवण्यासही तो मदत करतो. त्यामुळे निरोगी केस, त्वचा आणि सडपातळ शरीर हवे असल्यास आवळ्याचा आहारात नियमित समावेश करा.






