पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) प्रमुख म्हणून व्हाॅइस ॲडमिरल अनिल जग्गी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रमुख व्हाॅइस ॲडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून जग्गी यांनी नियुक्ती स्वीकारली. भारतीय नौदल अकादमीचे (आयएनए) माजी विद्यार्थी असलेले ॲडमिरल अनिल जग्गी १ जानेवारी १९९३ रोजी भारतीय नौदलात रुजू झाले. गेल्या तीन दशकांहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध कार्यालयीन, राजनैतिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी क्षेपणास्त्र जहाज आयएनएस वीर, तसेच शिवालिक श्रेणीतील स्टेल्थ गाईडेड मिसाइल फ्रिगेट आयएनएस सह्याद्रीचे नेतृत्व केले आहे.






