Monday, November 10, 2025

आणखी एक लढा जनतेच्या हक्कासाठी

आणखी एक लढा जनतेच्या हक्कासाठी
अल्पेश म्हात्रे अंधेरी विकास समितीसह सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेतर्फे काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील सेवन हिल्स हॉस्पिटल येथे शेकडो कार्यकर्त्यांसहित मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व कार्याध्यक्ष दिलीप माने व अध्यक्ष माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केले. उद्देश एकच होता, मरोळ येथील रुग्णालय खासगी उद्योगपतीच्या ताब्यात जाण्यापासून वाचवणे. मरोळ-अंधेरी पूर्व हा भाग प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीयांचा भाग आहे. २०१० ला मुंबई महानगरपालिकेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या सेवन हिल्स या रुग्णालयाचा फायदा आत्तापर्यंत विभागातील बऱ्याच गरीब रुग्णांना मिळालेला आहे. सध्या हे रुग्णालय आंध्र प्रदेश येथील खासगी उद्योगपती चालवतात; परंतु व्यवसायातील नुकसानीमुळे सदरील उद्योगपती दिवाळखोरीत गेला. त्यामुळे हा रुग्णालयाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना हे रुग्णालय मुंबई स्थित खासगी उद्योगपतीला विकण्यात येणार अशी बातमी कळल्यामुळे अंधेरीतील जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. सेवन हिल्स रुग्णालय हे आशिया खंडातील मोठ्या रुग्णालयांमध्ये गणले जाणारे रुग्णालय आहे. त्यामध्ये साधारण १ हजार ५०० खाटा, ३६ विविध ऑपरेशन थेटर, १२० अतिदक्षता विभाग, बरोबरच कर्मचारी वसाहत अशा एकूण १७ एकरमध्ये अद्यावत असे हे रुग्णालय स्थापन करण्यात आलेले आहे. असे रुग्णालय एखाद्या खासगी उद्योगपतीकडे गेल्यानंतर ते पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये रूपांतरित होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना तेथे उपचार मिळणे तर दूरच; परंतु आतमध्ये प्रवेशही मिळणार नाही, ही रास्त भीती असल्यामुळे अंधेरी विकास समितीने पुढाकार घेऊन या मोर्चाची सविस्तर निवेदने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री आशीष शेलार, तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, स्थानिक खासदार रवींद्र वायकर, अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांना सविस्तर दिली असल्याचा त्यांनी उल्लेख केला. स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी हा विषय विधान भवनातही उपस्थित केला होता. या विषयाचे गांभीर्य माहीत असल्यामुळे व स्थानिक नागरिकांच्या भावनेला प्रतिसाद म्हणून हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ते स्थानिक नागरिकांसोबतच समितीच्या लोकांच्या सोबत होते. या संघटनेचे अध्यक्ष राजेश शर्मा यांनी रुग्णालयाच्या आर्थिक गणिताबद्दल सविस्तर चर्चा करून हे रुग्णालय महानगरपालिकेतर्फे चालविण्यास कसलीच अडचण असणार नाही असे सांगितले. हे रुग्णालय कुठच्याही खासगी उद्योगपतीस देण्यात आले तर जास्तीत जास्त ३०० ते ४०० कोटी एवढी रक्कम होईल. अशा परिस्थितीमध्ये ७० हजार कोटींचे बजेट असणारे व साधारण ८० हजार कोटी मुदत ठेव असणारे मुंबई महानगरपालिकेला हे रुग्णालय स्वतः चालवण्यास कसलीच अडचण भासणार नाही. रुग्णालय चालवण्यासाठी महिना साधारण पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित आहे आणि तो जी. एस. टी. व इतर उत्पादनाच्या स्त्रोतामधून सहजगत्या भागवला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल के. ई. एम. हॉस्पिटल व सायन हॉस्पिटलच्या धरतीवर हे हॉस्पिटल चालविले जावे जेणेकरून राज्यातील व विभागातील गरीब विद्यार्थ्यांना वाजवी किमतीमध्ये मेडिकल व नर्सिंगचा कोर्स पूर्ण करता येईल व त्याचा जास्तीत जास्त फायदा गरीब विद्यार्थ्यांना होईल. त्याकरिता कुठल्याही परिस्थितीमध्ये हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेतर्फे चालविण्यात यावे अशी मागणी करून हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेतर्फे चालविले जावे असा आग्रह गेल्या जुलै महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिका सार्वजनिक खासगी भागीदारी पीपीपी तत्त्वावर रुग्णालयांचा पुनर्वकास करीत होती. त्यानुसार मानखुर्दमधील लल्लूभाई कंपाउंड मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणि गोवंडीतील शताब्दी रुग्णालयांचा पुनर्विकास करण्यात येत होता मात्र त्यानंतरही दोन्ही रुग्णालये खासगी संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येणार असल्याने रुग्णांना उपचारासाठी अधिक पैसे मोजावे लागणार होते. त्यामुळे स्थानिक रहिवासी, विविध नागरी समूह सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षाच्या बावीस अधिक संघटनांनी एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले होते. खरं तर पालिका रुग्णालये म्हटले की अनेक जण नाके मुरडतात. रुग्णालयांमधील स्वच्छता किंवा आरोग्य विषय असुविधा ऐकायला मिळतात मात्र तरीही गोरगरीब जनतेसाठी पालिका रुग्णालय हा आरोग्य विषयक समस्यांसाठी चांगला माफक व सोयीस्कर पर्याय असतो. मुंबईत पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय हे सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयाला पालिकेकडून अर्थसहाय्य दिले जाते तर मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय हे उपचार पद्धती आणि इमारतीसाठी प्रसिद्ध आहे. परळ येथील केइएम रुग्णालय हे भारतात प्रसिद्ध असून येथे सामान्य माणसाची रीघ असते तर सायन रुग्णालय हे प्रसिद्ध रुग्णालय आहे. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय हे मिल्क बँक हायपर्युम ट्रॉमा सेंटरसाठी प्रसिद्ध आहे. या रुग्णालयात दररोज २५० पेक्षा जास्त रुग्ण अॅडमिट होतात आणि तितक्याच नागरिकांना घरी सोडले जाते. मुंबईतील पाच प्रमुख पालिका आणि सरकारी रुग्णालयात दर दिवसाला किमान ५१ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे पण त्या रुग्णांमध्ये जे रुग्ण शेवटच्या टप्प्यात खासगी रुग्णालयातून सार्वजनिक रुग्णालयात दाखल होतात त्यांना वाचवण्यात बरीच आव्हाने येतात. या रु आज मुंबई शहरातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून या रुग्णालयांकडे रुग्णांची रीघ लागलेली असते. मुंबईत जे. जे. रुग्णालयात सध्या १ हजार ३५२ खाटांची संख्या असून तेथे रोज अडीच हजार जण बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतात तर रोज साधारण १ हजार २५० रुग्ण दाखल होत असतातत. तर केइएम रुग्णालयात २ हजार २५० खाटांची संख्या असून रोज बाह्य रुग्ण विभागात ६ हजार ५०० रुग्ण उपचार घेतात तर रोज १ हजार ८०० रुग्ण दाखल होतात. सायन येथील टिळक रुग्णालयात १ हजार ९०० खाटा असून तेथे दररोज ६ हजार रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतात तर दाखल होणाऱ्यांची संख्या ही जवळपास तेवढीच आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात १ हजार ६३२ खाटांची संख्या असून रोज १ हजार २५० रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतात, तर १ हजार ८०० रुग्ण रोज दाखल होतात. पालिकेच्याच कुपर रुग्णालयात ७०० खाटांची संख्या असून रोज १ हजार ७०० बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतात तर रोज ५०० रुग्ण दाखल होतात असे काहीही असले तरी आजही मुंबईकरांसाठी ही रुग्णालये अपुरे पडत आहेत हे सिद्ध झालेले आहे. आज त्या रुग्णालयांची पाहणी केली असता अशा रुग्णालयांची कशी आवश्यकता आहे याची खात्री पटते. आज बाहेर खासगी रुग्णालयांकडून जी काही लूट सुरू आहे हे पाहता लोकांचा आजही जास्त भरोसा हा शासकीय रुग्णालयांवरच असतो. काहीही कोणीही, कितीही म्हटले तरी आजही शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात तसेच माफक व काही ठिकाणी मोफत अशी रुग्णसेवा सरकारी रुग्णालयात केली जात असते . आजही कित्येक मोठमोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया या शासकीय रुग्णालयातूनच केल्या जात असतात. त्यामुळे लोकांचा भरोसा हा शासकीय रुग्णालयांवरच असतो. आज मुंबईतील शासकीय रुग्णालयांवर मुंबईकरांपेक्षा बाहेरील रुग्णांचा जास्त भर असतो त्यामुळे मध्यंतरी बाहेरील रुग्णांकडून जास्त दर आकारण्याची योजना बनवण्यात आली होती. कारण मुंबईकरांच्या पैशावर चालणाऱ्या या रुग्णांचा फायदा मुंबई बाहेरील तसेच राज्य बाहेरील इतर नागरिकच जास्त घेत होते मात्र काही कारणास्तव हा प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला. आजही शासकीय दरात जमीन पदरात पाडून घेऊन तेथे पंचतारांकित रुग्णालय उभारून सर्वसामान्यांना दूर ठेवणाऱ्या रुग्णालयांकडे बघितले, तर व शासकीय रुग्णालयांच्या दारा बाहेरील गर्दी व तेथील अवस्था व ताण पाहिला तर आजही मुंबईकरांना व मुंबईसाठी शासकीय रुग्णालय किती आवश्यक आहे हे पटते त्यामुळे अंधेरी येथील हे रुग्णालय वाचावे यासाठी अंधेरी विकास समितीला अंधेरी येथीलच येथील नाही, तर संपूर्ण मुंबईतील व प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला तरच सर्वसामान्यांसाठी हे रुग्णालय टिकू शकेल नाहीतर हे सुद्धा रुग्णालय हातचे जाईल व मुंबईकरांच्या नशिबी पुन्हा महागडे उपचार येतील. निदान मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता तरी हे रुग्णालय हातचे जाऊ न देणे ही आपली सर्वांची व सरकारची जबाबदारी आहे हे खरे.
Comments
Add Comment