Monday, November 10, 2025

बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर उद्या मतदान

बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर उद्या मतदान

पाटणा : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २० जिल्यांतील १२२ विधानसभा जागांवर मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण ४५,३३९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी ४,१०९ केंद्रांना संवेदनशील, तर ४,००३ केंद्रांना अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहे. या केंद्रांवर मतदान संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.

कटोरिया, बेलहर, चैनपूर, चेनारी, गोह, नवीनगर, कुटुंबा, औरंगाबाद, रफीगंज, गुरुआ, शेरघाटी, इमामगंज, बाराचट्टी (३६ केंद्रे), बोधगया (२०० केंद्रे), रजौली, गोविंदपूर, सिकंदरा, जमुई, झाझा आणि चकाई या विधानसभा क्षेत्रांतील केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर बोधगयातील १०६ केंद्रांवर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. या सर्व केंद्रांवर पुरेशा सुरक्षा दलाची तैनाती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात एकूण १,३०२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १,१६५ पुरुष, १३६ महिला आणि १ थर्ड जेंडर उमेदवार आहे. या टप्प्यात ३ कोटी ७० लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी १ कोटी ९५ लाख पुरुष, १ कोटी ७४ लाख महिला, ४ लाख ४ हजार दिव्यांग मतदार, ६३,३७३ सेवा मतदार, ९४३ थर्ड जेंडर मतदार आणि ४३ एनआरआय मतदार आहेत. १८ ते १९ वयोगटातील ७ लाख ६९ हजार ३५६ नवमतदारही या टप्प्यात मतदानासाठी पात्र आहेत.

अंतिम टप्प्यात एनडीएचे १२२ आणि महाआघाडीचे १२६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामध्ये भाजपचे ५३, जद(यू)चे ४४, लोजपा-रामविलासचे १५, राष्ट्रीय लोक मोर्चाचे ४ आणि हम पक्षाचे ६ उमेदवार आहेत. तर राजदचे ७०, काँग्रेसचे ३७, व्हीआयपीचे ८, सीपीआयचे ४, सीपीआय(एमएल) चे ६ आणि सीपीआयचे १ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. याशिवाय जनसुराज पक्षाचे १२० उमेदवारही या टप्प्यात आपले नशीब आजमावणार आहेत.

या फेरीत माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद, रेणु देवी, मंत्री विजेंद्र यादव, नीतीश मिश्रा, प्रेम कुमार, कृष्णनंदन पासवान, प्रमोद कुमार, शीला मंडल, लेशी सिंह, जयंत राज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम, लोजपा (रामविलास) प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी, राजद नेते उदय नारायण चौधरी, रालोमो प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांच्या पत्नी स्नेहलता, काँग्रेसचे आमदार दलनेते शकील अहमद खान आणि भाकपा (माले) आमदार दलनेते महबूब आलम अशा अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा दावणीवर लागली आहे.

बिहारचे डीजीपी विनय कुमार यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यातील सुरक्षेची तयारी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. मतदान होणाऱ्या काही जिल्ह्यांचा भारत-नेपाळ सीमेशी तसेच काहींचा इतर राज्यांच्या सीमेशी संपर्क असल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. संबंधित राज्यांसाठी नोडल अधिकारीही नेमण्यात आले आहेत.

डीजीपींच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमा काल सील करण्यात आली असून, आंतरराज्यीय सीमाही आज सील केली जाणार आहे. सीमावर्ती भागांत तपासणी नाके उभारण्यात आले असून संयुक्त तपासणी केली जाणार आहे. या टप्प्यात एकूण १,६५० कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय, मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये राज्य पोलिस दलही तैनात असेल.

Comments
Add Comment