Sunday, November 9, 2025

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना महापालिकेच्या दरात सेवा सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने आरोग्य सेवा खासगी संस्थेच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बोरीवलीतील पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक सेंटर खासगी संस्थेच्या माध्यमातून चालवण्यासाठी विविध संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवले. यासाठी सहा वेळा मुदतवाढ देवूनही केवळ एकाच संस्थेने स्वारस्य दाखवली आहे. या एकमेव संस्थेलाच आता पंजाबी डायग्नोस्टिक सेंटर चालवण्यास दिले जाणार आहे. ही एकमेव संस्था म्हणजे क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर असून याच संस्थेने आपली चिकित्सा योजनेत महापालिकेचा विश्वास घात केला होता. तरीही महापालिका प्रशासनाने क्रस्नावर विश्वास टाकल्याने महापालिकेच्या दरात याठिकाणी खरोखरच भविष्यात सेवा सुविधा मिळतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईकरांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेने आरोग्य सेवांकरता सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण राबवण्याचा निर्णय घेतला. भगवती, मुलुंड अगरवाल आदींना विरोध झाल्यानंतर एमएमआरडीए, गोवंडी शताब्दी, आणि पंजाबी डायग्नोस्टिक सेंटर याकरता स्वारस्य अर्ज मागवले. यातील एमएमआरडीए रुग्णालयाकरता कोणताही प्रतिसाद आलेला नाही, गोवंडी पंडित मदनमोहन मालवीय अर्थात शताब्दी रुग्णालयासाठी दोन संस्थांचे अर्ज प्राप्त झाले. तर बोरीवलीतील पंजाबी डायग्नोस्टिक सेंटरकरता मागवलेल्या स्वारस्य अर्जांमध्ये एकमेव क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरचा अर्ज प्राप्त झाला आहे. ही एकमेव संस्था असल्याने आरोग्य विभागाने सहा वेळा मुदतवाढ देवूनही एकमेवच संस्था असल्याने अखेर याच संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आपली चिकित्साअंतर्गत रक्त चाचण्यांकरता चिकित्सा सेवा देण्यासाठी क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची निवड केली होती. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही एकमेव संस्था पात्र ठरली होती. फेब्रुवारी २०२३ पासून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर संस्थेच्या माध्यमातून सेवा गरीब रुग्णांना चार वर्षांकरता म्हणजे फेब्रुवारी २०२७ पर्यंत होती. पण कंत्राटातील चाचण्यांची संख्या मर्यादा ऑक्टोबर २०२४ मध्ये संपुष्टात आल्यानंतर पुढे या संस्थेने त्याच दरात काम करण्यास नकार दिला.आणि ऑक्टोबर २०२४ पासून ही सेवा बंद पडली होती. त्यानंतर ही सेवा आता ऑगस्ट २०२५नंतर सुरु झाली. मुंबईतील आपली चिकित्सा योजनेचे सर्व काम आपल्याच मिळावे म्हणून चाचण्यांचे दर कमी लावून चार वर्षांचे कंत्राट आपल्याच पदरात पाडून घेतले. परंतु चार योजना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षांत बोली लावलेल्या दरात या संस्थेला देता आलेले नाही. त्यामुळे केवळ काम मिळवण्यासाठी या संस्थेने हा प्रयत्न केला. परंतु यामध्ये महापालिकेची योजना नवीन संस्थेची निवड होईपर्यंत बंद राहिली. त्यामुळे पंजाबी डायग्नोस्टिक सेंटरचे काम दिल्यानंतर महापालिकेच्या नियमांनुसार गरीब रुग्णांना ही संस्था खरोखर सेवा देईल का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. या संस्थेकडून एकदा विश्वासघात झाल्यानंतरही महापालिकेने या संस्थेवर विश्वास का दाखवला असाही प्रश्न केला जात आहे.
Comments
Add Comment