गझल... म्हणजे नुसते शब्द नव्हेत, ती आहे प्रत्येक भावना शब्दांत गुंफण्याची कला! विरह, प्रेम, जीवन आणि आत्मचिंतन यांना सुरांनी दिलेले एक हळुवार आलिंगन म्हणजे गझल. याच हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण गझलांचा बहारदार नजराणा घेऊन नाट्यझंकार प्रॉडक्शन्स निर्मित 'साज़-ए-गझल' हा हिंदी आणि मराठी गझलांचा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा 'शुभप्रारंभाच्या प्रयोग' शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे रात्री ८.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गझलगायक निनाद आजगांवकर, दत्तप्रसाद रानडे आणि गायिका संगीता मेळेकर हे आपल्या जादुई आवाजाने गझलांचा झंकार निर्माण करणार आहेत. कार्यक्रमाच्या ओघवत्या निवेदनाची धुरा प्रसिद्ध कलाकार अभिजीत खांडकेकर आणि चेतना भट यांनी सांभाळली आहे. या संपूर्ण सादरीकरणाची संहिता समीरा गुजर यांनी लिहिली आहे, तर निर्मितीची बाजू माधुरी मिलिंद जोग यांनी सांभाळली आहे. या सांगीतिक मैफलीला अजय मदन यांच्यासह प्रशांत ललीत, प्रसाद पाध्ये, प्रथमेश साळुंके आणि संदेश कदम यांची साथ संगत मिळणार आहे. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा कार्यक्रमाला अधिक आकर्षक बनवणार आहे.






