Saturday, November 8, 2025

मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात उंदरांचा हैदोस

मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात उंदरांचा हैदोस

आयुक्तांचा कोट कुरतडला, भेटवस्तूंची केली नासधूस

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील मूषकांचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या कीटक नाशक विभागाच्या वतीने होत असला तरी सध्या महापालिका आयुक्त कार्यालयच उंदरांमुळे त्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. उंदरांचा हैदोस एवढा वाढला की त्यांनी आयुक्तांचा कोट कुरतडून टाकला आहे, तसेच भेट वस्तूतील चॉकलेटही खाऊन टाकली. त्यामुळे गुरुवारी रात्री उंदीर पकडण्यासाठी सापळे रचण्यात आले, या सापळ्यात जिवंत आणि मृत असे दहा ते बारा उंदीर आणि त्यांची पिल्लू अडकली गेली. मात्र, याठिकाणी आणखी काही मोठे उंदीर असण्याची शक्यता असून आणखी त्याठिकाणी सापळे रचण्यात आले. त्यामुळे शनिवारी किती उंदीर त्या सापळ्यात अडकतात याकडे उंदीर पकडणाऱ्या पथकाचे लक्ष आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांचे कार्यालय असून या कार्यालयात मोठ्या प्रमाणात उंदरांचा त्रास असल्याच्या तक्रारी येत होत्या. परंतु, आता या उंदरांनी थेट आयुक्तांच्या वस्तूंची नासधूस करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, उंदरांनी आयुक्त कार्यालयातील काही चॉकलेटचे बॉक्स कुरतडून टाकले आहेत, तसेच त्यातील चॉकलेटही खाल्ले आहेत, शिवाय आयुक्तांचा कोटही कुरतडला असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे उंदिर पकडणाऱ्या जाणकार अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

आयुक्तांच्या कार्यालयात उंदरांचा उच्छाद होत असल्याने त्यांना पकडण्यासाठी सापळे रचण्यात आले. या सापळ्यात शुक्रवारी १० ते १२ मेलेले उंदिर आणि ५ ते ६ जिवंत उंदिर हे अडकले गेले. परंतु अजूनही काही उंदिर त्याठिकाणी असण्याची शक्यता असल्याने आयुक्तांच्या कार्यालयात अजून काही सापळे रचण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment